पुणे जिल्हा | नारायणगावात 1975 जणांची आरोग्य तपासणी

नारायणगाव (वार्ताहर) – राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, श्री बालाजी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. अनिल खैरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 1975 जणांची तपासणी करण्यात आली. शिबिरात निदान झालेल्या सर्व रुग्णांचे उपचार आणि शस्त्रक्रिया, 150 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच योगेश पाटे यांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष व शिबिराचे मुख्य समन्वयक डॉ. मानसिंग साबळे, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, संतोष खैरे, सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजू पायमोडे, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर,
गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तहसीलदार रवींद्र सबनीस, बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, आरएफओ प्रदीप चव्हाण, नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, ज्ञानेश्वर औटी, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, शिबिराचे आयोजक आणि नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान उपसरपंच योगेश पाटे, डोळे फाउंडेशनचे डॉ.संदीप डोळे व मान्यवर उपस्थित होते.
मुक्ताई समाज मंदिर नारायणगाव येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये सर्व रोग निदान, रक्तदान, ओरल कॅन्सर, महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. प्रत्येक रुग्णास मोफत औषधांचे वाटप करण्यात आले असून 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 550 रुग्णांची आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.
शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर पुणे, एच. व्ही . देसाई नेत्र रुग्णालय, पुणे संस्थांमधील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. डॉ. शुभदा वाव्हळ यांनी आभार मानले.





