Pune : आरोग्य केंद्रांकडे लाखोंचे वीजबिल थकले

पुणे : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे आतापर्यंत ५२ लाख ६७ हजार ९९५ रुपये वीजबिल थकीत आहे. सध्या उपचारच मोफत केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्पन्नाचा आर्थिक स्रोत बंद झाला. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वीज बिल भरण्यासाठी पैसेच नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राकडे वीजबिल कसे भरायचा, असा प्रश्न भेडसावत आहे.
सध्या जिल्हा परिषदेकडे प्राथमिक उपकेंद्रांतील वीज पुरवठा खंडीत करू नये म्हणून निधीची अधिकाऱ्यांकडून सातत्याने मागणी होत आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या १०८ आहे, तर उपकेंद्राची संख्या ५३९ इतकी आहे. बाह्यरुग्ण नोंदणी १० रुपये, आंतररुग्ण शुल्क २० रुपये, आहार शुल्क १० रुपये, हिमोग्लोबिन चाचणी २० रुपये, लघवी चाचणी ३५ रुपये आदी शुल्क आकारण्यात येते. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे हे सर्व उपचार मोफत मिळण्यास सुरुवात झाले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले.
त्यात आता गेल्या दिवसांपासून महावितरणकडून थकीत वीज बिल भरण्यासाठी आरोग्य केंद्रांकडे तगादा लावत आहेत. काही ठिकाणी तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार झाला मात्र, त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठांशी बोलून वीज पुरवठा सुरळीत ठेवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आर्थिक स्रोत बंद
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये पाच रुपयांमध्ये केस पेपर निघत होता. या पैशांतून आरोग्य केंद्रे वीज बिलाचा भरणा करत होते. पण आता हे पैसे बंद झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून निधीची तरतूद करण्याची गरज होती, ती अद्याप केलेली नाही. परिणामी स्थानिक पातळीवर केंद्रांमधील अधिकाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
थकीत वीज बिलाची तालुकानिहाय रक्कम
तालुका – थकीत रक्कम : आंबेगाव — २ लाख. बारामती — ६५ हजार. भोर – १० हजार . दौंड – ३ लाख ७१ हजार ५८०. हवेली — १२ लाख २२ हजार. इंदापूर — ४ लाख ५७ हजार. जुन्नर – ४ लाख २० हजार. खेड – ७, लाख १ हजार. मावळ – ८ लाख ८५ हजार ६००. मुळशी – ५० हजार. पुरंदर – ६ लाख २३ हजार. शिरूर — १ लाख ९१ हजार ४८५. वेल्हा — ७० हजार. एकूण – ५२ लाख ६७ हजार ९९५.





