नगर | उन्हाळ्यापूर्वीच महिलांच्या डोक्यावर हंडा

कोल्हार, (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे पाच ते सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे महिलांच्या डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या गावात पाहायला मिळत आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यभर जलजीवन मिशन योजनेची कामे मार्गी लावत असून, त्यांच्याच लोणी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात महिलांवर ही वेळ येत असून ही खेदाची बाब आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे पाणी वाटपाच्या नियोजनाचा बट्याबोळ झाला असून गावात पिण्यासाठी होणारा पाणी पुरवठा हा पाच ते सहा दिवसांतून एकदा होत आहे, सहा दिवसांतून एकदा आलेले पाणी साठवण करून तेच पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असल्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, मळमळ, हिवताप अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत आहे. दवाखाने रुग्णांच्या गर्दीने भरले आहेत.
गावातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन हे ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच गावातील पाणी नियोजन कोलमडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा ग्रामपंचायत मार्फत केला जातो. सर्वच कुटुंबांना हे पाणी पुरत नसल्यामुळे अनेक महिलांना आपली कामे सोडून डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहण्याची वेळ येत आहे. त्यात गावठाण हद्द भोसले नगर यासह संपूर्ण गावासाठी अवघा एक सार्वजनिक नळ ग्रामपंचायतकडून देण्यात आला असून तो देखील बंदिस्त गटारीचे चेंबर फोडून त्यावर काढण्यात आला असल्यामुळे मोठी दुर्गंधी निर्माण होत आहे.
नाकावर रुमाल बांधून पाणी भरण्याची वेळ महिलांसह ग्रामस्थांवर येत आहे. गावात अनेक ठिकाणी गटारी किंवा रस्त्यांची कामे सुरू असताना जलवाहिन्या फटून पाणी आणखी उशिराने येत असल्यामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या अडमुठ्या धोरणाला पुरते त्रासले असल्याचे चित्र गावात आहे. विशेष म्हणजे गावात महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी या गावचा कारभार पाहत असून, निम्म्यापेक्षा जास्त सदस्य या महिला आहेत. एकंदरीतच संपूर्ण गावात महिलांचे राज्य असून सर्वसामान्य महिलांच्या डोक्यावर आलेला हंडा खाली येत नाही, हे दुर्दैव आहे. पाणीप्रश्न न सुटल्यास ग्रामपंचायतीवर लवकरच हंडामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गावातील महिलांकडून देण्यात आला आहे.
आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय
काही दिवसांवर उन्हाळा येऊन पोहचलेला असताना, ग्रामपंचायतकडून पाणी नियोजनाचा बट्याबोळ झालेला आहे. जलजीवन मिशनचे कोटी रुपयांचे काम हे अद्याप पूर्ण व्हायला हवे होते, मात्र स्वार्थ आणि राजकारणाच्या गर्तेत अडकलेले हे काम देखील अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांची कामे पूर्ण नसताना साठवण तलावाचे काम जोमात सुरू आहे.
नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध नसताना स्थानिक प्रशासन मात्र आलेला निधी मार्गी लावण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. निधी खर्च करत असताना सत्ताधारी आपल्या संपर्कातील ठेकेदार यांना हाताशी धरत असून ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला तयार नाही. त्यामुळे ‘आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय’ अशी परिस्थिती गावात दिसून येत आहे. येत्या काळात भीषण पाणी टंचाईचा ग्रामस्थांना सामना करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.





