शेतकऱ्याचा रुद्रावतार..! कार्यालयात जाऊन तहसिलदारांची फोडली गाडी, नेमकं प्रकरण काय?

नांदेड: जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एका संतप्त शेतकऱ्याने तहसील कार्यालयातच तहसिलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्याने खळबळ उडाली आहे. अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याच्या रागातून शेतकरी साईनाथ खानसोळे (वय 34) याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.
या घटनेमुळे तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी साईनाथला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी याप्रकरणी खुलासा करत शेतकऱ्याच्या दाव्याला छेद दिला आहे.
काय आहे प्रकरण?
मुदखेड तालुक्यातील साईनाथ खानसोळे हा शेतकरी रविवारी (26 ऑक्टोबर) तहसील कार्यालयात आला होता. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचे पैसे आपल्यासह अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याचा आरोप करत त्याने तहसिलदारांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर फावड्याने हल्ला चढवला.
गाडीच्या काचा फोडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, आणि पोलिसांनी साईनाथला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस चौकशी करत आहेत.
शेतकऱ्याचा आरोप
साईनाथ खानसोळे याने आपल्या कृत्यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु शासनाकडून जाहीर झालेले अनुदान अनेकांना मिळालेले नाही. “शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही,” असे म्हणत त्याने आपला संताप व्यक्त केला. त्याच्या या कृत्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली.
तहसिलदारांचा खुलासा
या प्रकरणी तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी साईनाथच्या दाव्याला खोडून काढले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, साईनाथ खानसोळे याच्या बँक खात्यात यावर्षीचे अतिवृष्टीचे 6,200 रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. इतकेच नव्हे, तर मागील वर्षीचे अनुदानही त्याला मिळाले होते. “साईनाथला अनुदान मिळाले आहे, तरीही त्याने असे कृत्य का केले, याचा तपास पोलिस करत आहेत,” असे देऊळगावकर यांनी सांगितले.





