पिंपरी | मोठ्या पगाराची नोकरी सोडून बनला सहायक आयुक्त

पिंपरी, (प्रतिनिधी) – आयटी कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजची नोकरी, परदेशातील उच्च शिक्षणाची संधी असताना देखील प्रशासकीय सेवेची आवड त्यांना अस्वस्थ करत होती. त्यामुळे खाजगी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीची परिक्षेची तयारी सुरू केली.
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसोबत एमपीएससीच्या परीक्षा सुद्धा ते देत होते. परंतु, यशाचा रस्ता खडतर होता, अंतिम यश हे थोड्या-थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. मात्र, अपयशाने न खचता त्यांनी जिद्द, मेहनत, संयम व चिकाटीच्या जोरावर सहायक राज्यकर आयुक्तपदी मजल मारली.
ही कहाणी आहे. थेरगावमधील आनंदवन सोसायटी येथे राहणारे रोहित बाळासाहेब कोतकर यांची. रोहित कोतकर यांची एमपीएससीमधून सहायक राज्यकर आयुक्तपदी (जीएसटी विभाग, वर्ग -१) पदी निवड झाली आहे. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा देत प्रशासकीय क्षेत्रात यश मिळवले. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
रोहित यांनी शालेय शिक्षण वाकड येथील गुड सॅमारीटन स्कूल मधून घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटिल कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. हिंजवडी येथील बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये त्यांचे प्लेसमेंट झाले. आयटी कंपनीमध्ये मोठ्या पगाराची त्यांना नोकरी मिळाली. तसेच परदेशातील उच्च शिक्षणाची संधी असताना देखील मूळ प्रशासकीय सेवेची आवड ही त्यांना अस्वस्थ करत होती. त्यामुळे रोहित यांनी खाजगी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली.
प्रशासकीय सेवेचे बाळकडू
रोहित कोतकर यांचे ताथवडे डेअरी फार्म येथे बालपण गेले. वडील अन्नसुरक्षा अधिकारी पदी कार्यरत असल्याने लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेकडे करियर म्हणून ते आकर्षित झाले होते.
प्रशासकीय सेवेचे बाळकडू घरापासूनच अनुभवत असल्याने आपणही प्रशासकीय अधिकारी म्हणून आपला ठसा उमटवावा, अशी जिद्द मनाशी बाळगून रोहित बाळासाहेब कोतकर यांचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. यशाची गरुड भरारी त्यांचे कुटुंब आई, वडील, बहिण व मित्रपरिवार यांच्या पाठिंब्याने शेवटी सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.





