Pune viral video : तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स सरकारला देते; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यावरून कॅबचालकासोबत वाद, व्हिडीओ व्हायरल

Pune viral video : राज्यात सध्या मराठी-हिंदी भाषा बोलण्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात विविध ठिकाणी तशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. राज्य सरकारने हिंदी भाषा पहिलीपासून शिकविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. कालच ५ जुलै २०२५ रोजी मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येत आपल्या एकजूटची ताकद सर्वांना दाखवून दिली.
मनसे प्रमुख राज ठाकरेंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या आणि मराठीला विरोध करणाऱ्या सुशील केडियाचे मुंबईतील अॅाफिस मनसैनिकांनी फोडले. अशातच आता पुण्यातून मराठी बोलण्यावरून वादावादी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका परप्रांतीय महिला आणि कॅबचालक यांच्यात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादाचा हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओतील महिला परप्रांतीय आहे. कॅबचालकाने या महिलेला मराठीत बोलण्यास सांगितल्यानंतर महिलेने त्याच्याशी हुज्जत घालत मैं क्यू मराठी में बात करू असे उत्तर दिले. या महिलेने मी फक्त हिंदीचं बोलणार कारण हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे.
भाषाई विवाद का शानदार विडिओ देखिए। pic.twitter.com/j6fCHhKAiK
— Govind Bishnoi (@Govind0433) July 4, 2025
नेमकं व्हिडीओत काय ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत कॅमेऱ्याच्या मागून, ती महिला समोर उभ्या असलेल्या लोकांशी वाद घालताना ऐकू येते. एक कॅब चालक मराठीत बोलण्यास सांगत होता, त्याचे म्हणणे होते की, ती जर महाराष्ट्रात काम करत आहे तर तिने मराठीत बोलले पाहिजे. यावर ती महिला त्याच्यावर भडकते आणि म्हणते की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, म्हणून फक्त हिंदीतच बोलेल.
यावनंतर कॅबचालक आणि या महिलेत वाद सुरू होतो. या व्हिडीओत महिलेने “मी तुमच्यापेक्षा महाराष्ट्र सरकारला जास्त कर देते. आम्ही (हिंदी भाषिक लोक) काळा पैसा कमवत नाही.. आम्ही स्वच्छ आणि कायदेशीररित्या योग्य पैसे कमवतो आणि सरकारला पूर्ण कर देतो” असे उत्तर दिले आहे.
हेही वाचा : भारतात रॉयटर्सचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक ; कारण अस्पष्ट





