हिंगण्यात ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने चोरले

पुणे- हिंगणे खुर्द परिसरात 70 वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. त्यानंतर चोरट्यांनी घरातून पावणेदोन लाखांचे दागिने चोरले आहेत. शालिनी बबन सोनावणे असे या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी या एका सोसायटीत एकट्याच राहात होत्या. तर, मुलगा विराट हा शेजारील सोसायटीत राहतो. शनिवारी रात्री विराट हा शालिनी यांच्याकडे गेला होता. त्यावेळी त्या हॉलमध्ये निपचीत पडल्याचे दिसले. त्यामुळे विराट यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
शालिनी यांचे पती ग्रामविकास अधिकारी होते. त्यांचे निधन झाले आहे. तर, दोन्ही मुले त्यांच्यापासून वेगळी रहातात. फिर्यादी मुलगा दिवसातून दोन ते तीन वेळा शालिनी यांना भेटत होता. घटनेच्या दिवशीही विराट दुपारी भेटून गेला होता.
त्यानंतर त्यांची मुलगीही घरी गेली होती. मात्र, तिला कडी बाहेरुन लावलेली दिसली. तिने याची माहिती विराट यांना दिली. त्यांनी पाहणी गेल्यावर ही घटना उघडकीस आली.
अंगावरील दागिने तसेच…
शालिनी यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या अंगावरील दागिन्यांना चोरट्यांनी हातही लावला नाही. तसेच घरात असलेली रोकड आणि देवघरातील चांदीचे दागिनेही चोरण्यात आले नाहीत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.





