“ते चार वेळा आमदार आहेत तर मी चार वेळा मुख्यमंत्री होतो”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे खोचक उत्तर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे नेते असण्याबाबत व पक्षात फूट आहे की नाही यावर झालेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी हे काका-पुतणे तुम्हाला खुळ्यात काढत आहेत असे म्हणत टोला लगावला होता. त्यावरून आता खुद्द शरद पवारांनी बच्चू कडूंना खोचक शब्दांत फटकारले आहे.
दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार बच्चू कडूंनी खोचक टिप्पणी केली होती. “शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढंच मी सांगेन”, असे बच्चू कडू म्हणाले होते. “हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत”, असा टोलाही त्यांनी लगावाल होता.
दरम्यान, कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना बच्चू कडूंच्या या वक्तव्याविषयी बोलताना बच्चू कडूंना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. “बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे तुम्ही उद्या तर आणखीन कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मला मागाल”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, पत्रकारांनी बच्चू कडू चार वेळा आमदार असल्याची आठवण करून देताच शरद पवारांनी “ते चार वेळा आमदार आहेत. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो”, असे खोचक शब्दात फटकारले आहे.





