पर्यटन स्थळांचा विकास रोडावला ! पर्यटनासाठी वैयक्तिक पातळीवर अनेक उपक्रम; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

कामशेत, दि. 23 (वार्ताहर) – मावळ तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारशामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक तरुणांनी ऍग्रो टूरिजम, कॅम्पिंग अशा अनेक वेगवेगळ्या संकल्पना राबवित पर्यटकांना मावळच्या निसर्गरम्य वातावरणात बोलावत आहेत. परंतु पर्यटन स्थळ म्हणून मावळ तालुक्याला विकसित करण्याबाबत प्रशासन मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
मावळ तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. मावळामध्ये पावसाळ्यात असंख्य वाहणारे धबधबे, ऐतिहासिक गड किल्ले व लेण्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून मावळ तालुक्यामध्ये येत असतात. दिवाळी झाल्यानंतर विशेषतः पवन मावळामध्ये पवना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅम्पिंग राहण्याची सोय आहे यासाठी पुणे-मुंबई इतर शहरातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आनंद व्यक्त करण्यासाठी व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
परंतु या मावळ तालुक्यामध्ये पर्यटन स्थळे तर भरपूर आहेत. परंतु त्यांचा विकास झालेला नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. एस.टीची सुविधा नाही. पर्यटकांना स्वतःच्या गाड्या घेऊन यावे लागते.स्थानिक प्रशासनाकडून या पर्यटन स्थळाचा कसलाच प्रकारचा विकास झाला नाही.
मावळ मधील पर्यटन स्थळे
मावळातील पवना धरण परिसर, किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, मोरगिरी, राजमाची ढाकोबा किल्ला, इंदोरीचा किल्ला तर कार्ला लेणी, भाजे लेणी, बेडसे लेणी, येलघोलची लेणी, उसकान लेणी, कांब्रे लेणी, पाल लेणी आहेत. प्रति पंढरपूर, पुरातन वाघेश्वर मंदिर, वडेश्वर मंदिर, कोंडेश्वर मंदिर, वडीवळे महादेव घोरवडेश्वर, प्रति शिर्डी, देहू, भंडारा डोंगर, स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी तळेगाव मावळ मध्येच आहे. लोणावळा हा थंड हवामानाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते या लोणावळ्यामध्ये दिवाळीनंतर खूप मोठ्या प्रमाणावरती परत एक येत असतात याच भागामध्ये भुशी डॅम, टायगर पॉईंट, वळवन डॅम असून अशी अनेक प्रसिद्ध पर्यटक स्थळे आहेत.
रस्त्यांची दुरावस्था
पर्यटक मावळ तालुक्यात येत असतात परंतु मावळ तालुक्यातील रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. पर्यटन स्थळांकडे जात असताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेही समजून येत नाही त्यामुळे पर्यटकांना याचा त्रास होतो.
पवना धरणातील ऐतिहासिक वाघेश्वर मंदिर
इतिहासकालीन वारसा असलेले पवना धरणातील ऐतिहासिक वाघेश्वर मंदिर हे मंदिर आठ महिने पाण्यामध्ये व चार महिने पाण्याबाहेर असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावरती वाघेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यात येत असतात.
दिवाळीनंतर आवर्जून येतात पर्यटक
थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळ्याकडे पाहिले जाते. पर्यटक लोणावळ्यामध्ये दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर ती येत असतात. या ठिकाणी खंडाळा घाट, टायगर पॉईंट, भुशी डॅम, मनोरंजनाची अनेक साधने, हॉटेल्स अनेक प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. या सर्वांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात येत असतात.

आठ किल्ले दुर्लक्षित
सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद पिलाने म्हणाले की, मावळ तालुक्यामध्ये एकूण आठ किल्ले आहेत. या किल्ल्यांवरती अनेक संघटना काम करतात परंतु पुरातत्त्व विभागाकडून या किल्ल्यांची देखभाल होत नाही. आठपैकी लोहगड किल्ल्यावरती पुरातत्व विभागाकडून तिकीट आकारले जाते परंतु त्या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या पर्यटकांना
सुविधा उपलब्ध नाही.





