Dara Singh : ‘रामायण’मधील हनुमान म्हणून घराघरात लोकप्रिय झाले, कुस्तीच्या आखाड्यातही दरारा; कोण होते दारा सिंग?
Dara Singh : १९८७ मध्ये रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत दारा सिंह यांनी भगवान हनुमानाची भूमिका साकारली होती.

Dara Singh : सध्या अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, पहिल्या भागानंतर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, दुसऱ्या भागात भगवान हनुमानाच्या भूमिकेत अभिनेता सनी देओल दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, हनुमान म्हटले की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम एकच चेहरा येतो, तो म्हणजे दिवंगत अभिनेते दारा सिंह यांचा!
१९८७ मध्ये रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत दारा सिंह यांनी भगवान हनुमानाची भूमिका साकारली होती. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी अभिनयामुळे ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली.
लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच त्यांच्या हनुमानाच्या भूमिकेवर भरभरून प्रेम केले. मात्र, दारा सिंह यांची ओळख केवळ एका भूमिकेपुरती मर्यादित नव्हती. अभिनय, कुस्ती आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला होता.
दारा सिंह यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे मूळ नाव दिदार सिंह रंधावा असे होते. तरुण वयातच त्यांनी कुस्तीच्या आखाड्यात आपली ओळख निर्माण केली. पुढे याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
१०० हून अधिक चित्रपटात केले काम
१९५२ मध्ये ‘संगदिल’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६२ मधील ‘किंग काँग’ या चित्रपटामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री मुमताज यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती. या दोघांनी तब्बल १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘फौलाद’, ‘रुस्तम-ए-हिंद’, ‘मेरा नाम जोकर’, ‘मर्द’ आणि ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या नावावर १०० हून अधिक चित्रपट आहेत.
कुस्तीसाठी मोठे योगदान
अभिनयाप्रमाणेच कुस्तीच्या क्षेत्रातही दारा सिंह यांचे मोठे योगदान होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास ५०० कुस्तीचे सामने लढले आणि अपराजित राहिल्याचे सांगितले जाते. ‘रुस्तम-ए-हिंद’सह कॉमनवेल्थ आणि जागतिक कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवले. १९८३ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी कुस्तीला अलविदा केला.
चित्रपटसृष्टी आणि राजकारणापर्यंत पोहचला प्रवास
यानंतर दारा सिंह यांनी राजकारणातही पाऊल ठेवले. भारतीय जनता पक्षाच्या शिफारशीवरून त्यांना २००३ ते २००९ या काळात राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले होते. अशा प्रकारे कुस्तीच्या आखाड्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास चित्रपटसृष्टी आणि राजकारणापर्यंत पोहोचला.
८४ व्या अभिनेत्याचे निधन
आपल्या अभिनयाने, ताकदीने आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दारा सिंह यांचे १२ जुलै २०१२ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. आज ते आपल्यात नसले, तरी ‘रामायण’मधील हनुमानाच्या भूमिकेमुळे ते कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.





