पुणे | ऐकलं का पुणेकर शहरात फक्त ५३ खड्डे?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने शहरातील चौकाचौकांत आणि मुख्य रस्त्यांवर शेकडो खड्डयांची माळ तयार झाली आहे. या खड्डयांमुळे शहरात वाहतूक कोंडी वाढली असून, नागरिकांनी हाडांच्या दवाखान्यात रांगा लावलेल्या असताना महापालिकेच्या पथ विभागाने मात्र शहरात केवळ ५३ खड्डे असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
पथ विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून त्यांचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, खरंच पथ विभागातील अधिकारी काम करतात का, असा सवालही उपस्थित केला जात आहे, तर महापालिका पुणेकरांच्या जमखेवर मीठ चोळत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
तक्रार आली तरच ‘खड्डा’
पथ विभागाकडून शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर १५ मोबाईल व्हॅनची सुविधा आहे. याशिवाय, काही जेट पॅचर मशिन, तसेच पूनावाला संस्थेच्या माध्यमातूनही शहरात खड्डे दुरुस्त केले जातात. मात्र, रस्त्यावर दिसलेले खड्डे दुरुस्त न करता केवळ हेल्पलाइन अथवा ऑनलाइन तक्रार प्रणालीवरच आलेल्या तक्रारीच महापालिका सोडविते.
प्रत्यक्षात सिंहगड रस्ता, नगर रस्ता, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, पौड रस्ता, विद्यापीठ चौक, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शंकरशेठ रस्ता, हडपसर रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांना खड्डयांचा विळखा असताना पथ विभागाचे अधिकारी मात्र खड्डेच नसल्याचा अजब दावा करत आहेत.
काय सांगते आकडेवारी
पथ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२४ ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत शहरातील रस्त्यांवर ८ हजार ५२५ खड्डे पडले होते. त्यातील सुमारे ८ हजार ४७२ खड्डे दुरुस्त करण्यात आले असून, शहरात आता केवळ ५३ खड्डे शिल्लक आहेत. त्यात येरवडा- वडगावशेरी खराडी भागात १७ खड्डे, बाणेर- शिवाजीनगर औंध- ० खड्डे, वारजे- सिंहगड रस्ता- धनकवडी भागात १ खड्डा, शहराच्या मध्यवर्ती पेठा २८ खड्डे, हडपसर- कोंढवा १ खड्डा, समाविष्ट गावे ६ खड्डे.
तातडीने खड्डे दुरुस्त करा
शहरात जागोजागी पडलेल्या खड्डयांवरून माध्यमांमध्ये महापालिकेच्या कारभाराची लक्तरे निघत असल्याने पथ विभागाने अखेर गुरुवारी कार्यकारी अभियंत्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत खड्डयांवरून झाडाझडती झाली असून, पावसाने उघडीप घेतल्याने तातडीने खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.




