राजकारणातून टोप्या लुप्त झाल्या: सुशीलकुमार शिंदे यांचे विधान; बदलेल्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत म्हणाले…

Sushilkumar Shinde : मराठी सिनेसृष्टीतील अॅायकॅानिक ‘सामना’ या डॅा. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाले असून, याचे औचित्य साधत कोहिनूर कट्टा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या टोपीखाली दडलयं काय? हे गीत पडद्यावर पाहताना राजकारणातून टोप्या लुप्त झाल्या असल्याचे जाणवते, असे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच त्यांनी सध्याच्या बदलेल्या राजकीय सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले.
हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या ध्येयवादी चित्रपटांच्या तुलनेत जे खपते ते विकणाऱ्याच्या मागे निर्माते उभे राहतात, ही खरी शोकांतिका असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले. ध्येयवादी चित्रपटांना आर्थिक पाठबळ देणे निर्मात्यांना व्यवहाराच्या पातळीवर धोक्याचे वाटते. नवसमाज निर्मितीच्या ऊर्मीने चित्रपटाची निर्मिती झाली पाहिजे, अशी भावना शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कोहिनूर कट्ट्याच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘सामना’चे निर्माते रामदास फुटाणे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कट्ट्याचे प्रमुख आणि उद्योजक कृष्णकुमार गोयल, ‘आशय फिल्म क्लब’चे सतीश जकातदार व वीरेंद्र चित्राव, दिग्दर्शक परेश मोकाशी उपस्थित होते. सामना ५० या कार्यक्रमात पहिला साहित्य कला गौरव सामना सन्मान वाळवी चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
….त्यांच्या मदतीने आम्ही बर्लिनला पोहचलो
बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी सामनाची निवड होऊ नये यासाठी काही पुढारी दिल्लीत प्रयत्न करीत होते. चित्रपट पडल्याने बर्लिनला जायचे कसे असा प्रश्न होता. मुंबईला जाऊन सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. ते आम्हाला घेऊन सांस्कृतिक मंत्री मधुकरराव चौधरी आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे गेले. त्यांच्या मदतीने आम्ही बर्लिनला पोहचलो, अशी आठवण सामना चित्रपटाचे निर्माते फुटाणे यांनी सांगितली.





