पुणे | रस्ते दुरुस्तीसाठी हाॅटमिक्सच मिळेना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात पावसाने रस्त्यांची चाळण झालेली आहे. त्यामुळे महापालिकेवर टीका होत आहे. त्यामुळे पाऊस थांबताच रस्ते दुरुस्त करण्याचा दावा प्रशासन करत आहे.
मात्र, यासाठी आवश्यक असलेले हाॅटमिक्सच (गरम डांबर आणि खडीचे मिश्रण) महापालिकेस उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा पुणेकरांना खड्डयांच्या सोबतच काढावा लागणार आहे.
महापालिकेचा येरवडा येथे हाॅटमिक्स प्रकल्प असून तो कालबाह्य झाला आहे तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच खासगी कंपन्यांचे हाॅटमिक्स प्रकल्प पावसाळ्यात चार महिने बंद आहेत.
त्यामुळे मनपाचा पथ विभागही हतबल झाला आहे. येरवडा येथील हाॅटमिक्स प्रकल्पात दिवसाला सुमारे दोनशे टन हाॅटमिक्स तयार केले जाते. त्याच्या उपयोगाने रस्ते दुरुस्ती चांगली होते.
मात्र, सततच्या पावसामुळे हाॅटमिक्स प्रकल्पासाठी आणलेली खडी ओली होत आहे. त्यामुळे डांबर आणि खडी एकजीव होत नसल्याने रस्ते वारंवार उखडत आहेत. त्यातच महापालिकेने ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या हाॅटमिक्सची मागणी केली असली, त्यांच्याकडे ते उपलब्ध नाही
इतर पर्यायी ठरताहेत तकलादू
महापालिकेकडून हाॅटमिक्स सोबतच पेव्हर ब्लाॅक तसेच कोल्डमिक्सचा वापर खड्ड़े दुरुस्तीसाठी केला जातो. मात्र, हे उपाय तकलादू ठरत आहेत.
शहरातील वाहनांची संख्या अधिक असल्याने कोल्डमिक्स तसेच ब्लाॅक वाहनांच्या वजनाने निघून जातात. त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. त्यामुळे महापालिका सध्यातरी कोल्डमिक्स वापरून रस्ते दुरुस्तीचा प्रयत्न करत आहे.
रस्ते दुरुस्तीसाठी हाॅटमिक्स सर्वाधिक प्रभावी आहे. मात्र, खडी थोडी ओली असेल, तर मिश्रण उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे पाऊस थांबल्याशिवाय रस्ते दुरुस्ती प्रभावीपणे करणे शक्य नाही.- अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महापालिका





