हाथरस दुर्घटनेतील ‘भोले बाबाने’ आपल्या मृत लेकीवर केला होता ‘चमत्कार’; त्यानंतर झाले असे की…

Hathras stampede । हाथरस दुर्घटनेनंतर धार्मिक सत्संग करणाऱ्या स्वयंभू बाबा सूरज पाल उर्फ नारायण साकार हरीचा शोध सुरू आहे. मैनपुरी येथील त्यांच्या आश्रमापासून ते कासगंज येथील घरापर्यंत पोलीस पोहोचले आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. अपघातात नोंद झालेल्या गुन्ह्यात सूरज पाल किंवा ‘भोले बाबा’ यांचे नाव नाही. मात्र त्याचे जुने कारनामे समोर येत आहे. २४ वर्षांपूर्वी सुरज पाल आणि त्यांच्या पत्नीसह ६ जणांना चमत्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
मार्च 2000 मध्ये सूरज पाल यांच्या स्वतःच्या दत्तक मुलीच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूरज पाल आणि त्यांच्या पत्नीला मूलबाळ नसल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. त्यांना एक दत्तक मुलगी होती. मुलीला कॅन्सर झाला होता. 18 मार्च 2000 रोजी मुलीचा मृत्यू झाला. सूरज पाल यांच्या समर्थकांनी मुलीचा मृतदेह ‘मल्ल का चबुतरा’ नावाच्या स्मशानभूमीत नेला. ते ‘भोले बाबा’ येतील आणि मुलीला जिवंत परत आणतील यावर ठाम होते.
वृत्तात म्हटले आहे की, समर्थक बराच वेळ अडून राहिले तेव्हा चार पोलिस ठाण्याचे पोलिस तेथे पोहोचले. समर्थकांवर लाठीचार्ज केल्यानंतर सूरज पाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी स्वत:हून दखल घेत सूरज पाल विरोधात गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये पाल व्यतिरिक्त त्यांची पत्नी प्रेमवती आणि इतर 5 जणांची नावे नोंदवण्यात आली आहेत. एफआयआरच्या तपशिलात असे लिहिले आहे की स्नेह लताला ‘चमत्कारिक शक्तीं’द्वारे जिवंत करण्याचा कट रचला जात होता.
या सर्वांविरुद्ध ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हा कायदा ‘जादुई’ गुणधर्मांचा दावा करणारी औषधे, उपचार किंवा त्यांच्या जाहिरातींवर बंदी घालतो. मात्र काही काळानंतर पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी डिसेंबर 2000 मध्ये या प्रकरणाचा अंतिम अहवाल दाखल केला होता.
दरम्यान, हाथरस दुर्घटनेतील एफआयआरमध्ये म्हटले आहे की, दुपारी 2 वाजता सूरज पाल यांची गाडी जवळून गेल्यानंतर भाविकांनी तेथे माती गोळा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, लोकांचा मोठा जमाव एकमेकांना चिरडायला लागला. त्यामुळे तेथे अनेकांना जीव गमवावा लागला. रुग्णालयात उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला आहे.





