Hasan Mushrif : राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचे दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. यानंतर आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. याविषयी बोलताना मुश्रीफ यांनी “जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. केवळ अजित पवार यांच्यावर टीका करत राहणं एवढंच त्याचं काम आहे. आता ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याच्यावर ते का बोलत नाही. याचा उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी मला द्यावे. केवळ अजित पवारांवर बोलत राहणं एवढंच त्यांचं काम आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी लावला असल्याचे देखील हसन मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले.
राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे. याविषयी हसन मुश्रीफ यांनी, “डॉक्टरांनी संप मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण यावर आमची बैठक झालेली आहे. त्यांची तात्काळ निवासाची व्यवस्था करावी यासाठी भाड्याने इमारती घेण्याच्या सूचना देखील मी सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रमुखांना सूचना केल्या आहेत. त्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक लावली आहे. ही मागणी देखील त्यांची लवकरच पूर्ण केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी एका सभेला संबोधित करत असताना काय माहिती शेवटची निवडणूक कोणती असेल ? असे म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना “अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. हे काकाच्या मृत्यूची वाट बघतायेत. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात नक्कीच दाखवेल,” असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.