रामपाल कश्यप कोण आहेत? स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पायात घातले ‘जोडे’; 14 वर्षांपासून होते अनवाणी

हिसार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील हिसार येथील महाराजा अग्रसेन विमानतळावर नव्या टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली आणि हिसार ते अयोध्या दरम्यानच्या पहिल्या व्यावसायिक विमानसेवेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी हिसारमध्ये जनसभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. याचवेळी, कैथल येथील रामपाल कश्यप यांची भेट घेऊन त्यांनी १४ वर्षांपूर्वीचा संकल्प पूर्ण केला आणि स्वतःच्या हस्ते त्यांना जोडे घातले.
रामपाल कश्यप कोण आहेत?
रामपाल कश्यप हे हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. २०११ मध्ये त्यांनी संकल्प केला होता की, नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत आणि त्यांची भेट होईपर्यंत ते अनवाणी राहतील. त्यांचा विश्वास होता की, मोदींसारखा नेता देशाचा कायापालट करू शकतो. आज, १४ वर्षांनंतर, पंतप्रधानांनी त्यांना जोडे घालून त्यांचा संकल्प पूर्ण केला. यावेळी मोदी म्हणाले, “अरे भाई, असं का केलंस? यापुढे असे प्रण करू नकोस.” ही भेट भावनिक आणि अविस्मरणीय ठरली.
काँग्रेसवर हल्लाबोल
हिसारमधील जनसभेत मोदींनी काँग्रेसवर तुष्टिकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मुस्लिमांबद्दल खरी सहानुभूती असेल, तर काँग्रेसने मुस्लिमाला पक्षाध्यक्ष बनवावं आणि निवडणुकीत ५० टक्के तिकीट द्यावं.” त्यांनी २०१३ मध्ये वक्फ कायद्यातील बदलांवरूनही टीका केली. “वोट बँकेसाठी काँग्रेसने वक्फ कायद्यात बदल करून संविधानाची पायमल्ली केली,” असं ते म्हणाले. तसेच, बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला होता, पण कर्नाटकातील काँग्रेस सरकारने SC, ST, OBC यांचे हक्क हिसकावून धर्म आधारित आरक्षण दिल्याचा आरोप त्यांनी केला.
हिसार विमानतळाच्या नव्या टर्मिनलसाठी ४१० कोटी रुपये खर्च होणार असून, यामुळे हरियाणाची कनेक्टिव्हिटी सुधारेल. अयोध्या उड्डाणाने भावनिक आणि आध्यात्मिक जोडणीसह विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.





