पिंपरी | पाणी टंचाईमुळे टँकरला सुगीचे दिवस

सांगवी, (वार्ताहर) – वाढत्या उन्हामुळे दापोडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, कासारवाडी, चिखली, जाधववाडी आदी परिसरातील सोसायट्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यामध्ये दिवसाआड येणारे पिण्याचे पाणी, दापोडी भागात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे उन्हाळ्यात टँकरद्वारे नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. व्यावसायिक बांधकामेही तेजीत असल्याने बांधकामांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने टँकर व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
दापोडी परिसरात नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. गुलाबनगर, पवारनगर या चाळी वस्तीतील नागरिकांना कमी दाबाने दिवसाआड येणार्या पाण्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चाकरमानी मंडळी, भाडेकरू रहिवासी यांना पाण्याचे नियोजन करावे लागत आहे.
येथील सोसायट्यांना आठवड्यातून किमान दोन तीन वेळा टँकर मागवावा लागत आहे. त्यामुळे रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कमी दाबाने दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, दुरूस्त्या, अधूनमधून महावितरणचे दुरुस्ती कामामुळे होणारे शटडाऊन यामुळे खंडित होणारा वीजपुरवठा आदी कारणांमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
पिंपळे निलख परिसरात कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्यामुळे सोसायट्यांना टँकरचा भुर्दंड सोसावा लागत आहे. जुनी सांगवी भागातील ममतानगर भागातील रहिवाशांना आठवड्यातून दोनदा टँकरद्वारे पाण्याची गरज भागवावी लागत आहे. अधूनमधून काही कारणांनी पाणी न आल्यास सोसायटीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
टँकरमुळे सोसायट्या आर्थिक अडचणीत
शहर, उपनगरातील अनेक सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यातच फेब्रुवारी ते जून या चार महिन्यांत पाणी कमी पडत असल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागत आहे. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत टँकरची बिले ही काही लाखाच्या घरात जातात. परिणामी सोसायटीचे आर्थिक गणित कोलमडून पडते. त्यामुळे फ्लॅटधारकांकडून मेंटेनन्स वाढवून आर्थिक नियोजन करावे लागत आहे.
उद्योगनगरीत कंपनी, व्यवसाय, नोकरी आदी करून दोन पैसे जमा करून जीवनातील मोठं स्वप्न म्हणजे आपल्या हक्काचं घर घेणे. ते घेतले परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या घरात टँकरने पाणी आणावे लागत आहे.
दरवर्षी टॅक्स भरूनही महापालिका नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवू शकत नसेल तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कित्येक वर्षांपासून दिवसाआड पाणी व पाणीटंचाईची सामना आम्ही नागरिकांनी करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. – स्थानिक नागरिक.





