Harshwardhan Sapkal : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा; काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
राज्य सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली.

Harshwardhan Sapkal : राज्य सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली.
सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले, राज्यातील अनेक भागांत गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत दीड महिन्यापासून पाऊस पडलेला नाही आणि शेतातील पिके करपून जात आहेत, तरीही महायुती सरकार या कृषी संकटाबाबत उदासीन आहे.
सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति हेक्टर ५०,००० रुपये जमा करावेत आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी. सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत, तर आम्ही मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
सरकार केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करत आहे, परंतु ठोस निर्णय घेत नाही. पालक मंत्र्यांनीही संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार संवेदनशील नाही. शेतकरी हालअपेष्टा सहन करत आहेत, पण सरकार त्यांच्या दुर्दशेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
कुंभमेळ्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर सरकार ३५० कोटी रुपये खर्च करत असताना, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास मात्र टाळाटाळ करत आहे, असे सपकाळ म्हणाले.
मोदींच्या आवाहनांत विसंगती
सरकारने कृत्रिम पावसाचा विचार करावा आणि दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. अजूनही वेळ गेलेली नाही. हे सणासुदीचे दिवस आहेत आणि सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करून दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत दिली पाहिजे. सपकाळ यांनी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवांवरही टीका केली.
लोक विविध अडचणींचा सामना करत असताना असे उत्सव साजरे करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोकांनी तेलाचे दिवे लावावेत या आवाहनाचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले, हे आवाहन मोदींच्याच पूर्वीच्या त्या आवाहनांशी विसंगत आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकांना तेल कमी वापरण्यासह काटकसर करण्याचे आवाहन केले होते, असे ते (Harshwardhan Sapkal) म्हणाले.






