Harshwardhan Sapkal – प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालत लोकशाहीला तिलांजली देण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत असतो. तशीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे राहतात. राज्यातील या ‘लुटारू’ सरकारने घोटाळ्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावे, श्वेतपत्रिका काढावी. महाविकास आघाडीच्या आजच्या अधिवेशनपूर्व बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार का गैरहजर राहिले, हे माहिती नाही; परंतु प्रत्यक्ष विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरेल, असे सपकाळ म्हणाले. काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेकीसंदर्भात बोलताना सपकळ म्हणाले, की काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही. मात्र, आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तालिबानी पद्धतीने कारभार करतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला केला, त्यादिवशी पोलिसांवर कोणाचा दबाव होता? आज पोलीसांनी दिलेली सुरक्षाव्यवस्था त्या दिवशी का दिली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली येत अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सोयाबीन, मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी आम्ही राज्यात पदयात्रा काढणार आहोत. एपस्टीन फाइल्समध्ये मोदी सरकारमधील मंत्री आणि उद्योगपतींचे नाव आले. मात्र, मोदी सरकारने काहीच केले नाही. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील गोष्टींवरही खुलासा केलेला नाही, असेही सपकाळ म्हणाले.