Harshwardhan Sapkal: टिपू सुलतानाची तुलना थेट शिवरायांशी… हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने भाजप आक्रमक; राजकारण तापले
Harshwardhan Sapkal: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी "छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे कार्य समकक्ष आहे," असे खळबळजनक वक्तव्य केले.

Harshwardhan Sapkal: मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू असलेल्या वादात आता एका नव्या विधानाने तेल ओतले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे कार्य समकक्ष आहे,” असे खळबळजनक वक्तव्य केले असून, यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या शौर्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचा विचार मांडला आणि शौर्य गाजवले, त्यांचाच आदर्श घेऊन बऱ्याच काळानंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे या मातीचे पुत्र होते आणि त्यांनी कधीही विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यांच्या शौर्याचा विचार करता, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे.”
भाजपची आक्रमक भूमिका: ‘हे तर मतांसाठी लांगूलचालन’-
सपकाळ यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाने अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या विधानाचा निषेध करत काँग्रेसवर निशाणा साधला. “शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सर्वांना न्याय दिला, तर टिपू सुलतानने हिंदूवर अत्याचार केल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसकडून टिपू सुलतानचे उदात्तीकरण केले जात आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असून काँग्रेसने याबद्दल जाहीर माफी मागावी,” अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे.
कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल इन्होंने जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज इनकी तुलना टीपू सुल्तान से की है, इसकी हम निंदा करते है, उनको शर्म आनी चाहिए।
(नागपुर | 14-2-2026)#Maharashtra #Nagpur #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/Ysqy3Bnp11
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 14, 2026
दरम्यान, मालेगाव उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आली होती, ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती. आता प्रदेशाध्यक्षांच्या थेट विधानामुळे हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत. भाजप या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याची शक्यता असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.




