Harshvardhan Sapkal – बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतुन काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला असा अर्थ होत नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी विविध विषयांवर भाष्य केले. बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेतलेला नाही. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने हा उमेदवारी माघारी घेतली. २०२९ च्या निवडणुकीत काँग्रेस नक्कीच मैदानात उतरेल, अशी भूमिकाही सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी संघटन सृजन अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. पक्षात मोठे संघटनात्मक बदल होणार होणार आहे. संघटन सृजन अभियानांतर्गत ७ हजार ५०० पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशा विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केला आहे. पक्षाला मजबूत आणि तरुण नेतृत्व देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सपकाळ यांनी नमूद केले. शहरासाठी दोन शहराध्यक्ष नेमणे ही केवळ संघटनात्मक प्रक्रिया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सपकाळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणूक आयोग हा एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वागत आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये आयोग ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे मत चोरीचा मुद्दा आम्ही पुन्हा एकदा एसआयआर (विशेष तपास अहवाल) च्या माध्यमातून लावून धरणार आहोत. निवडणुक आयोगाच्या कामकाज पध्दतीच्या विरुध्द नागरिकांनी एकत्र येऊन दंड थोपटले पाहिजेत, असे ठाम मतही सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.