पुणे जिल्हा | इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर

इंदापूर, (प्रतिनिधी)- निर्णय घ्यायला उशीर झाला, पण घेतला आणि हा निर्णय फक्त इंदापूरपुरता नाही तर महाराष्ट्राच्या समाजकारणाला शक्ती देणारा अशा प्रकारचा आहे. मला महाराष्ट्र बदलायचंय, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय.
सर्वसामान्य लोकांचे जीवनमान बदलायचे आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि हे करायचे असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे.
हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे. राज्याचे काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम आहे. अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर सोमवारी (दि. 7) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी,
तसेच भारतीय जनता पक्षाच्या विविध विभागातील पदाधिकार्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर लगेच त्यांच्या उमेदवारीचीदेखील घोषणा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, उत्तमराव जानकर, नारायणआबा पाटील, युवक नेते राजवर्धन पाटील,
अंकिता ठाकरे पाटील, निहाल ठाकरे, अशोक घोगरे, अॅड. तेजसिंह पाटील, विजय कोलते, अॅड. राहुल मखरे, आशुतोष भोसले, छायाताई पडसळकर, सागर मिसाळ, अमोल भिसे, दत्तात्रय बाबर,
कालिदास देवकर, लालासाहेब पवार, विलास वाघमोडे, शरद जामदार, रघुनाथ राऊत, अलकाताई ताटे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे, तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले की, काहीही काम द्यावं; मात्र काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे. कठीण काम असेल, लोकांच्या हिताचे असेल, लोकांच्या जीवन मरणाचे असेल ती कामे हर्षवर्धन यांच्याकडे दिली जातील. हे काम देण्यासाठी त्यांना इंदापूर तालुक्यातील जनतेने, महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, मला आता कुठेही उभा राहायचे नाही.
मला जनतेने 14 वेळेस निवडून दिले आहे. यापैकी इंदापूरच्या जनतेने सात वेळा मला साथ दिली. त्यामुळे मला स्वतःसाठी मागायचे नाही.
अशी कबुली शरद पवार यांनी दिली. राज्यात विजय संपादन करण्यासाठी, महाराष्ट्र जुन्या काळातील यशवंतराव चव्हाण व आदर्श नेत्यांनी जे आदर्श राज्य, जे आम्हा सर्वांना दाखवलं. तो इतिहास पुन्हा एकदा करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या सारख्यांंची गरज आहे.
राज्याचा संसार नीट करणारा जावई
काही लोक मला विचारत होते की कसं होणार? काय होणार? म्हटलं काही काळजी करू नका. जावई कोणाचा आहे? कोणालाही पोरगी आम्ही देत नसतो. आम्ही चांगलं घर बघूनच मुलींना देत असतो त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालंय.
संसार नीट साजरा करा तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे. हे बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता. आज त्या जावईचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी स्वाभिमान बाळगतो असे गौरवोद्गार शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल काढले.





