पुणे जिल्हा | हर्षवर्धन पाटील तालुक्याचे आधारस्तंभच

इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्याची सामाजिक, राजकीय जडणघडण करण्यामध्ये,कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या विचाराचा वारसा घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात, गावात,
विकासात्मक परिवर्तन होण्यासाठी मेहनत घेतली त्यामुळेच, आज व उद्याही, हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याचे आधारस्तंभ राहतील, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संस्थेचे चेअरमन रघुनाथ राऊत यांनी काढले.
इंदापूर शहरातील हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा केला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे, शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी राऊत बोलत होते.यावेळी शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोटार वाहतूक संस्थेचे संचालक, कामगार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रघुनाथ राऊत म्हणाले की, हर्षवर्धन पाटलांच्या नावाने सहकारी मोटार वाहतूक संस्था मागील कित्येक वर्षांपासून स्थापन झाली. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल. याचा विचार हर्षवर्धन पाटील सातत्याने करत असतात.
त्यामुळेच आजही तालुक्यामध्ये सहकारी संस्थांचे जाळे टिकून आहे. त्यांनी तालुक्यासाठी दिलेले योगदान कोणालाही विसरता येणार नाही. आगामी येणारे विधानसभा निवडणुकीत फक्त हर्षवर्धन पाटील यांचा चेहरा समोर ठेवून सर्वांनी काम करावे, असेही आवाहन त्यांनी केले.





