पुणे जिल्हा | हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रीय स्तरावर बळ

इंदापूर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात सहकारमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी पूर्ण वेळ काम केले होते. तसेच सहकार क्षेत्रात साखर उद्योगात अनेक बारकावे सोडवण्यासाठी, राष्ट्रीय साखर सहकारी महासंघाच्या माध्यमातून केंद्रस्तरावर हर्षवर्धन पाटील पाठपुरावा करत आहेत.
या गोष्टीची दखल खुद्द केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. पाटील यांच्या कामकाजावर अमित शहा खूश असल्याने, राष्ट्रीय स्तरावर हर्षवर्धन पाटील यांना बळ देण्याचे संकेत स्पष्ट मिळाले आहेत.
राजकारण व सामाजिक कामकाजात मोठा फरक आहे. काँग्रेस पक्षातून हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्यानंतर, हर्षवर्धन पाटील यांच्या कार्याचे कितपत भाजप दखल घेते, याचा अनेक दिग्गजांना अंदाज देखील नव्हता. राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहण्याची भूमिका, हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या सहकार क्षेत्राच्या अभ्यासातून केली आहे.
मागील दोन दिवसांत दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निमंत्रित करून, देश पातळीवरील साखर उद्योगाला नवी दिशा देण्याची अनोखी संकल्पना हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित केलेल्या उद्योग परिसंवाद व कार्यक्षमता पुरस्कार सोहळ्यात देशभरातील सहकार चळवळीतील दिग्गजांनी अनुभवली.
दहा वर्षाचा रोड मॅप काही दिवसातच तयार करणार असून तो केंद्र सरकारला सुपूर्द केला जाईल. असा शब्द केंद्रीय मंत्री अमित शहा यांना हर्षवर्धन पाटील यांनी दिल्लीत दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्याचे पुढे असणारी अनेक संकटे आगामी काळात सोडवण्याची जबाबदारी, केवळ हर्षवर्धन पाटील यांच्या मुळे होणार आहे हे मात्र निश्चित.
ऊसउत्पादकाचा तोटा हाऊ देणार नाही
यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांचे चाललेले कामकाज याबद्दल गौरवोद्गार काढले. हर्षवर्धन पाटील तुम्ही दोन वर्षे सलग आपल्या राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात असे काम करा की, नवीन सहकारी साखर कारखाने देशभरात उभे राहतील.
तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन देत केंद्रीय मंत्री शहा यांनी दिले. तसेच दहा वर्षाचा साखर उद्योगाचा रोड मॅप केंद्र सरकारला दाखल करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील उसाची शेती करणार्या एकाही शेतकर्याचा, एक रुपया देखील तोटा न करता. प्रसंगी केंद्र सरकार तोटा सहन करेल मात्र ऊस उत्पादकांना न्याय देईल. अशी भूमिका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतल्यामुळे, राष्ट्रीय स्तरावर हर्षवर्धन पाटील यांना मोठी काम करण्याची जबाबदारी अमित शहा यांनी सूचित केल्याचे दिसते.




