पुणे जिल्हा | हर्षवर्धन पाटील यांनी साखर संघाचा राजीनामा द्यावा- थोरात

भवानीनगर, (वार्ताहर) – हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा संघटनेतील पदाचे राजीनामा दिले त्याप्रमाणे साखर संघाच्या अध्यक्षपदाचा व एनसीडीसीच्या संचालक पदाचाही त्वरित राजीनामा द्यावा.
या पदांचा राजीनामा देऊन आपण इतर कोणत्याही पक्षात जाण्यास मोकळे आहात, असे आवाहन अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात यांनी केले. थोरात यांच्या या वक्तव्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
इंदापूर तालुक्यातील राजकीय घडामोडी विषयी तानाजी थोरात यांनी आपली परखड भूमिका मांडली, हर्षवर्धन पाटील यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे. भाजपचा अत्यंत सोयीस्कर असा वापर करून घेतला गेला.
भाजपाकडून स्वार्थ साधल्यानंतर त्यांनी आपली भूमिका अतिशय पद्धतशीरपणे बदलली. आज भाजपा सोडून इतर पक्षाचा घरोबा करण्याचे ठरवले आहे व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा बनाव करून आपली राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी भूमिका बदलत आहेत.
1995 साली महाराष्ट्रामध्ये भाजपने यांना राज्यमंत्री केले ते पद्धतशीरपणे विसरले. भाजपाने हर्षवर्धन पाटलांचे अतिशय लाड केले पण यांचा बालहट्ट कधीच संपला नाही. मारुतीच्या शेपटाप्रमाणे यांच्या मागण्या वाढत गेल्या.
2019 मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना भाजप कार्यकर्त्यावर विधानसभेची उमेदवारी देऊन लादले गेले तरीही आम्ही सर्व जुने हेवे दावे विसरून पक्ष आदेश म्हणून सर्वांनी त्यांचे अगदी मनापासून काम केले.
त्या ठिकाणी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले, हीच उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाली असती तर चित्र वेगळे राहू शकले असते.





