ICC Test Rankings 2024 : जो रूटने गमावला ‘नंबर वन’चा मुकुट, क्रमावारीत इंग्लंडच्याच युवा फलंदाजाने मारली बाजी….

ICC Test Batting Rankings 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने आपली साप्ताहिक क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. खरं तर, इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने आपले नंबर-1 कसोटी फलंदाजीचे स्थान गमावले आहे. जो रूटची खुर्ची त्याच्याच देशाचा युवा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकने हिसकावून घेतली आहे. हॅरी ब्रूक आता जगातील नंबर-1 कसोटी फलंदाज बनला आहे. हॅरी ब्रुकला त्याच्या अप्रतिम कामगिरीनंतर हा पुरस्कार मिळाला आहे.
Joe Root’s reign is over 😮
A new World No.1 has been crowned in the ICC Men’s Test Batting Rankings 🏅 https://t.co/4r1ozlrWSA
— ICC (@ICC) December 11, 2024
इंग्लंडचा युवा स्टार बॅट्समन हॅरी ब्रूक आता टेस्ट फॉरमॅटमध्ये नंबर-1 बॅट्समन बनला आहे. ब्रुक गेल्या काही काळापासून अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. ब्रूकने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सलग शतके झळकावली आहेत. मागील तीन कसोटी डावांमध्ये, ब्रूकने प्रत्येक वेळी 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.
ब्रूक नंबर-1 बनल्यानंतर आता जो रूट दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. रूट आणि ब्रूकमध्ये फक्त 1 रेटिंग पॉइंटचा फरक आहे. अशा स्थितीत या दोन्ही फलंदाजांमधील आगामी सामन्यादरम्यान नंबर-1 बनण्याची लढाई सुरूच राहणार आहे.
टॉप-10 मध्ये फक्त दोन भारतीय…
कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंवर नजर टाकली तर अव्वल-10 मध्ये फक्त दोन भारतीय खेळाडू आहेत. यामध्ये युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल चौथ्या स्थानावर आहे. जयस्वालचे 811 रेटिंग गुण आहेत. जैस्वाल व्यतिरिक्त, स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा दुसरा खेळाडू आहे ज्याने टॉप-10 कसोटी फलंदाजी क्रमवारीत आपले स्थान कायम ठेवले आहे.
मात्र, यावेळी पंतचे क्रमवारीत मोठे नुकसान झाले असून तो सहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरला आहे. पंतचे 724 रेटिंग गुण आहेत. पंत आणि जैस्वाल यांना त्यांच्या क्रमवारीत आणखी सुधारणा करायची असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात त्यांना फलंदाजीच्या जोरावर आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल.





