Harishchandragad Accident : हरिश्चंद्रगडावर काळजाचा थरार! दर्शन घेऊन उतरताना कड्यावरून कोसळला दगड; तरुणाचा दुर्दैवी अंत
Harishchandragad Accident : जुन्नर दरवाज्याकडील कठीण पायवाटेने खाली उतरताना कड्यावरून सैल दगड डोक्यावर कोसळला; घोडेगावच्या ३८ वर्षीय तरुणाने गमावला जीव.

Harishchandragad Accident – जुन्नर तालुक्यातील खिरेश्वरपासून पुढे उंचावर असलेल्या हरिचंद्रगड (ता. अकोले) येथे पुरातन शिवलिंग आहे. रविवारी महाशिवरात्री निमित्ताने दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा गडावरून खाली उतरताना कड्यावरून निसटलेल्या दगडाचा जबर आघात झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेश किसन डामसे (वय ३८, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) असे नाव आहे. ते दर्शन आटोपून जुन्नर दरवाज्याकडील पायवाटेने खाली उतरत होते.
यावेळी कड्यावरचा सैल दगड अचानक निसटून त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले. स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी तात्काळ मदत करून दुर्गम आणि कठीण पायवाट असल्यामुळे जखमी अवस्थेत त्यांना झोळीत टाकून सुमारे पाच किलोमीटर पायी चालत खिरेश्वर गावात आणले. तेथून रुग्णवाहिकेतून पुढे वैद्यकीय उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी मात्र, त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गडावर मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसत आहे. कड्यावरून सैल दगड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने याठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दामसे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.





