‘सपा’सोडून भाजप प्रवेश करणारे हरिओम यादव कोण आहेत? पक्षाने त्यांची हकालपट्टी का केली होती?

लखनौ – राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांना ३० दिवसांहून कमी कालावधी उरला असतानाच राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर होताना दिसतायेत. राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला तीन मंत्र्यांनी सोडचिट्ठी दिली असून त्यांच्यासोबत ४ आमदारांनीही एक्झिट घेतली आहे. एकीकडे भाजपला गळती लागली असतानाच दुसरीकडे इनकमिंग झाल्याचं देखील दिसतंय. समाजवादी पक्षाच्या दोन तर काँग्रेसच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या फिरोजपूर येथील सिरसगंज विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार हरिओम यादव यांची ‘सपा’वर टीका करताना जीभ घसरली आहे. यादव यांनी, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्ष हा तळवे चाटणाऱ्यांचा पक्ष झाला असल्याचं म्हटलंय.
“समाजवादी पक्ष आता मुलायम सिंह यांचा समाजवादी पक्ष राहिलेला नाही. पक्षामध्ये आता तळवे चाटणाऱ्यांची चालती असून त्यांनीच अखिलेश यादव यांना घेरलं आहे. हीच लोकं अखिलेश यांना कमजोर बनवतायेत.” असा आरोप हरिओम यादव यांनी केला.
“राम गोपाल यादव (समाजवादी पक्षाचे महासचिव) व त्यांच्या मुलाला मी पक्षामध्ये नको आहे. त्यांना वाटतंय की मी पक्षात राहिलो तर त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल.” असा आरोप देखील हरिओम यादव यांनी लगावला. यादव यांच्यावर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षातून काढण्यात आलं होत. त्यांच्यावर फिरोझाबाद पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप उमेदवाराला मदत केल्याचा आरोप होता.





