#INDvAUS 1st T20 : पंड्याने केली पराभवाची मिमांसा व समर्थन; म्हणाला, “मधल्या व अखेरच्या…”

मोहाली – भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पराभव पत्कारावा लागला. मात्र, संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने याची कारण मिमांसा करताना मधल्या षटकातील फलंदाजीतील अपयश तसेच अखेरच्या षटकांतील सुमार गोलंदाजीचे समर्थनच केले आहे.
तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभव सगळ्याच खेळाडूंची निराशा करणारा ठरला. मात्र, केवळ अखेरच्या षटकांत गोलंदाजांनी केलेली निराशाजनक कामगिरीच या पराभवाला कारणीभूत ठरली असे नाही. आम्ही विजयासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले. मधल्या षटकात धावा करण्याचा वेग काहीसा मंदावला हे खरे असले तरीही द्विशतकी धावसंख्या विजय मिळवण्यासाठी पुरेशी होती, असे त्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर विजयाची संधी निर्माण झाली होती. मात्र, अखेरच्या पाच षटकांत ज्या पद्धतीने गोलंदाजी होणे गरजेचे होते ते घडले नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनी अफलातून फलंदाजी केली व आमच्या हातून विजय हिरावून घेतला.
समिक्षक संघाच्या अखेरच्या गोलंदाजीबाबत टीका केली, पण आम्ही आमच्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करण्याचा प्रयत्न केला. सामन्यात विजय व पराभव हे अटळ असतात. मात्र, आता त्याबाबत विचार करत राहण्यापेक्षा आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असेही पंड्या म्हणाला.





