Hardeep Singh Nijjar: कॅनडात मारल्या गेलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरबद्दल (Hardeep Singh Nijjar) भारतीय प्रशासनाने कॅनडाच्या सरकारला वेळोवेळी माहिती दिली होती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही (Red Corner Notice) जारी केली असल्याचे सांगितले होते, पण कॅनडाच्या प्रशासनाने निज्जरवर कधीही कारवाई केली नाही. चुकीच्या तथ्यांच्या आधारे त्याला कॅनडाचे नागरिकत्व देण्यात आले. भारतीय नोंदीनुसार, हरदीपसिंग निज्जरवर भारतात हत्या आणि इतर दहशतवादी कारवायांचे डझनभर गुन्हे दाखल होते. पोलिसांनी आपल्यावर पकड घट्ट केल्याचे पाहून हरदीप सिंग 1997 मध्ये रवी शर्माच्या नावाचा बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पळून गेला होता.
नंतर हरदीप सिंग कॅनडाला पोहोचला. तो एका विशेष वर्गाचा आहे म्हणून भारतात त्याचा छळ केला जात सांगत त्याने कॅनडात आश्रय मिळण्यासाठी अर्ज केला. त्याच्या या बनावट कथेच्या आधारे तत्कालीन कॅनडाच्या प्रशासनाने त्याला नागरिकत्व देण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे, नागरिकत्वाचा दावा फेटाळल्यानंतर निज्जरने 11 दिवसांनंतर पुन्हा कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. यावेळी त्याने तिथल्याच एका महिलेशी लग्न केले असल्याचा आधारावर अर्ज केला.
निज्जरला गूढ परिस्थितीत कॅनडाचे नागरिकत्व मिळाले –
तत्कालीन कॅनडाच्या अधिकाऱ्यांनीही त्याचा हा दावा फेटाळून लावला. कारण तो ज्या महिलेशी लग्न करण्याविषयी बोलत होता ती वेगळ्या पुरुषाशी लग्न करण्याच्या आधारावर कॅनडामध्ये आली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी निज्जरला अचानक गूढ परिस्थितीत कॅनडाचे नागरिकत्व देण्यात आले. अखेर कॅनडाच्या सरकारने ती परिस्थिती काय आहे याबद्दल भारत सरकारला कधीही माहिती दिली नाही.
रेड कॉर्नर नोटीस असूनही कॅनडाने निज्जरला अटक केली नाही –
नोव्हेंबर 2014 मध्ये हरदीप सिंग विरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राच्या इंटरपोलने भारताच्या दाव्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. या संदर्भात भारतीय अधिकार्यांनी पुन्हा कॅनडाच्या प्रशासनाला हरदीप सिंग विरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची संपूर्ण माहिती दिली.
विशेष म्हणजे रेड कॉर्नर नोटीस असूनही कॅनडाच्या प्रशासनाने निज्जरला ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची नोटीसही बजावली नाही. हरदीप सिंगची या वर्षी जूनमध्ये कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली कारण तो तेथील टोळीयुद्धात सामील झाला होता.
रेड कॉर्नर नोटीस काय आहे ?
रेड कॉर्नर नोटीस ही एकतर खटल्यासाठी किंवा शिक्षा भोगण्यासाठी हव्या असलेल्या फरारींसाठी जारी केली जाते. प्रत्यार्पण, शरणागती किंवा तत्सम कायदेशीर कारवाई प्रलंबित असलेल्या व्यक्तीला शोधून तात्पुरती अटक करण्यासाठी जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना रेड नोटीस ही एक विनंती आहे.
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचं कॅनडाच्या संसदेला संबोधिक करताना म्हटलं होतं. तेव्हापासून संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अशातच भारतानं कॅनडाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य फेटाळून लावलं आहे. त्यावरुन कॅनडा आणि भारत यांच्यात मोठा वाद उफाळून आला आहे.