Hanuman Ansh Box Office : ‘हनुमान अंश’ने रचला नवा इतिहास! कमाईचा आकडा आता शंभर कोटी पार
Hanuman Ansh Box Office : नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट रिलीजच्या ३१ व्या दिवशी म्हणजेच रविवारीही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे.

Hanuman Ansh Box Office : रॉकिंग स्टार यशच्या ‘टॉक्सिक’ची जोरदार चर्चा सुरू असतानाच कमी बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या दिवसांत या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, आता रिलीजला एक महिना पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या कमाईने मोठा टप्पा ओलांडला असून नवा इतिहास रचला आहे.
‘हनुमान अंश’ने अनेक मोठ्या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकत बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट रिलीजच्या ३१ व्या दिवशी म्हणजेच रविवारीही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. Sacnilkच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने भारतात आतापर्यंत ११७.४६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन, तर ९९.२९ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. रविवारच्या अंतिम कमाईचे आकडे अद्याप समोर येणे बाकी आहे.
विशेष म्हणजे, केवळ १.८ कोटी ते २ कोटी रुपये इतके अंदाजे बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान अंश’ने कमाईचा मोठा टप्पा पार करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या चित्रपटाची कामगिरी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
सुरुवातीला मिळाला होता संथ प्रतिसाद
‘हनुमान अंश’ ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ १० लाखांची कमाई केली होती.
मात्र, चित्रपटाच्या भक्तिपूर्ण कथानकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्याची तोंडी प्रसिद्धी वाढत गेली. याचा थेट फायदा चित्रपटाच्या कमाईला झाला. तिसऱ्या आठवड्यापासून ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर वेग पकडला आणि त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत गेली आणि ती अजूनही कायम आहे.
Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावरील उडतरे येथे भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही





