फाशी..फाशी..! हात जोडूनही महाजनांचे प्रयत्न अयशस्वी; बदलापूर स्टेशनला नेमकं काय-काय घडलं?

Girish Mahajan । Badlapur School Girl Rape Case – बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्यांवर मागील आठवड्यात लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आता आज मंगळवारी संपूर्ण बदलापूर बंद करण्यात आले आहे. परंतु, बदलापूरकर इतक्यावरच नाही थांबले तर त्यांनी रेल्वे रोको करत आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
गेल्या नऊ तासांपासून अंबरनाथ ते बदलापूर ही रेल्वे सेवा ठप्प आहे. पण गेल्या काही तासांपासून सुरू असलेले आंदोलन पाहता महायुती सरकारचे संकटमोचक म्हटले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. परंतु, त्यांच्या या भेटीचाही काहीच परिणाम आंदोलनकर्त्यांवर झाला नसून आंदोलकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.
मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जात आक्रमक आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बोलण्यास येण्याची विनंती केली. परंतु, आंदोलकांचे कोणीही नेतृत्व करत नसल्याने त्यांना चर्चा करणे शक्य झाले नाही. तर यावेळी आंदोलनकर्त्यांनी केवळ फाशी… फाशी… इतकीच घोषणा केली.
ज्याला उत्तर कायद्यामध्ये कोणत्याही तत्काळ फाशीची शिक्षा नसल्याचे उत्तर मंत्री महाजनांकडून देण्यात आले. पण त्याहीवेळी आंदोलकांनी गिरीश महाजनांना फैलावर घेत महिला आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तर सरकारने इतर कोणतीही कारवाई न करता आरोपीला एकतर आमच्या हवाली करावे किंवा त्याला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, ही एकच मागणी करण्यात आली आहे.
मंत्री गिरीश महाजन आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांना काही महिला आंदोलकांनी प्रश्न विचारत म्हटले की, तुम्ही त्या आरोपीला आमच्या हाती द्या. आरोपीला लाईव्ह फाशीची शिक्षा देण्यात यावी, चिमुरडींसोबत झालेला प्रकार किती भयानक आहे. त्या प्रकाराची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी या महिलेकडून करण्यात आली.
तर, महिलेच्या मागणीला विनंती करत मंत्री महाजन म्हणाले की, मुलगी कोणाचीही असो, असा कायदा आहे का? आरोपीला लोकांच्या हवाल्यात देवून त्याला संपवून टाकावे? कोणाकडून काहीही बोलले गेले तरी मला त्याचा राग नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचा राग हा बरोबर आहे. आरोपीला कठोरात कठोर कारवाई केली जाईल. तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे महाजनांकडून सांगण्यात आले.
पोलिसांचा लाठीचार्ज ! अखेर रेल्वे मार्गावरून आंदोलकांना हटवले
आज बदलापूरकरांनी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. सातत्याने विनवण्या करून, मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आवाहनानंतरही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला करत दहा मिनिटात रेल्वे रूळ मोकळा केला. पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर आंदोलन रुळावरून हटले. यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली.
बदलापुरातील आदर्श शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार नंतर सकाळपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी सहा वाजल्यापासून आदर्श शाळेच्या समोर पालकांकडून आंदोलन सुरू होते. तर साडेनऊ वाजल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. त्यामुळे बदलापूर कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला.
पोलीस सातत्याने आवाहन करूनही आंदोलक हटत नव्हते. रेल्वे पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सह स्थानीक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. यामुळे जवळपास नऊ ते दहा तास रेल्वे मार्ग ठप्प होता.
अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला सुरू केला. त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटात रेल्वे रूळ मोकळे झाले. आंदोलक लाठी हल्ल्यानंतर चिडले. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक सुरू केली. रेल्वे स्थानकातून आंदोलन हटवल्यानंतर स्थानकाबाहेर आंदोलक रेल्वे स्थानकात शिरण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी त्यांना पळवून लावले.





