मोबाइल हाताळण्याने वाढवले हाडांचे दुखणे; तरूणाई होतेय बेजार

प्रगती जाधव-पाटील / सातारा : अन्न, वस्त्र आणि निवारा याच्या इतकेच मोबाइल अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी कामासाठी तर कधी ताण घालविण्यासाठी मोबाइल हातात असतो. मोबाइलच्या या वापराने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोप न लागणे असे त्रास अनेकांना होतात. पण मोबाइल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे.
मोबाईल बघताना शक्यतो आपण आपल्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पोझिशन किंवा बॉडी पोश्चरकडे फारसे लक्ष देत नाही. यामुळे मान- पाठ- कंबर सगळंच आखडून जातं. कोणी पाठीवर झोपून हात वर करून मोबाईल बघतात. यामुळे हात दुखू लागतात, बोटंही आखडून जातात. यासाठीच मोबाईल बघण्याची योग्य पद्धत माहित करून घेणे आवश्यक आहे.
1. यामुळे येतोय खांद्यावर ताण
बेडवर पाठ टेकवून झोपायचे आणि दोन्ही हात वर करून हातात मोबाईल पकडल्यास खांद्यावर आणि मानेच्या स्नायूंवर ताण येतो. एका कुशीवर झोपून एक हात कोपर्यात वाकवून तळहात डोक्याखाली ठेवून दुसर्या हाताने मोबाइल बघणेही खांदेदुखी वाढवणारे आहे. मोबाईल बघताना जो हात डोक्याखाली ठेवला जातो तो विरुद्ध दिशेने वळवलेला असतो. त्यामुळे खांद्याच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो, मानेचे स्नायूही ताणले जातात.
2. मणक्यात आणि कमरेतही येतो
मोबाईल बघताना शक्यतो आपण मोबाइल हातात पकडून आपली मान हलकेच पुढच्या दिशेने झुकवून खाली मान करून मोबाइल पाहतो, परंतु ही अतिशय चुकीची पद्धत आहे. पोटावर झोपून छातीखाली उशी ठेवून मोबाइल बघणे पाठीचा कणा आणि कंबरेच्या स्नायूसाठी त्रासदायक ठरतात. अशा पद्धतीने मोबाइल पाहिल्यास मणक्यात किंवा कंबरेत गॅपही येऊ शकतो. अशा पद्धतीने मोबाईल बघण्याची किंवा पकडण्याची सवय बहुतांश तरुण मुला- मुलींमध्ये बघायला मिळते.
3. ही आहे योग्य पध्दत
मोबाइल फोन वापरताना सर्वप्रथम मान पुढे झुकणार नाही याची काळजी घ्या.
फोन बघताना मान नेहमी नैसर्गिक स्थितीतच ठेवा.
लॅपटॉपचा वापर करताना मानेवर अतिरिक्त दबाव पडणार नाही अशा प्रकारे तो समोर ठेवा.
मोबाईल बघताना पोटावर म्हणजेच पालथे झोपा. पाय गुडघ्यात वाकवून वर उचला आणि हाताचे कोपरे जमिनीला टेकवत, दोन्ही हातात मोबाईल धरून तो पाहा. ज्यांना तीव्र पाठदुखी आहे, ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी या अवस्थेत बसू नये. या पोझमध्ये बसताना खांदे सरळ आणि पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा.
– डॉ. मनोजकुमार कांबळे, फिजिओथेरपीस्ट





