राजगुरूनगर नगरपरिषदेवर हंडा मोर्चा; पिण्याचे पाणी वेळेत व पुरेसे येत नसल्याने महिला आक्रमक

राजगुरुनगर – राक्षेवाडीचा काही भाग व साईनगर या राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीतील वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी एक महिन्यापासून वेळेत व मुबलक मिळत नव्हते; महिन्यापासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने येथील संतप्त महिलांनी राजगुरूनगर नगरपरिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत असलेल्या राक्षेवाडी, साईनगर या परिसरात राजगुरुनगर नगरपरिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या एक महिन्यापासून या भागात पाणीपुरवठा होत नाही. पाण्यासाठी महिलांनी अनेक वेळा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांपुढे व्यथा मांडल्या. निवेदन देऊनही कुठलीही दखल नगरपरिषदेने घेतली नाही. या परिसरातील नगरपरिषदेचे कर्मचारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात. नगर परिषदेच्या कारभाराला वैतागून संतप्त झालेल्या महिलांनी या भागातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या विभागप्रमुख अर्चना सांडभोर नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढत नगरपरिषदेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
राक्षेवाडी ते राजगुरूनगर नगर परिषदेपर्यंत डोक्यावर रिकामे हांडे घेऊन आंदोलक महिलांनी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नगर परिषदेच्या आवारात सर्व महिला एकत्र येत घोषणा देत कार्यालयाचा परिसर दणाणूनसोडला. एक महिन्यापासून या परिसरात पाणी नाही. विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. आमचा खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली.
अर्चना सांडभोर यांच्यासह अरुणा घुले, मीरा कराळे, शारदा सांडभोर, अर्चना तांबे, रूपाली पवार, निकिता साकोरे, तेजस्विनी पाटील, शांताबाई काळे, वैशाली वाडेकर, लक्ष्मी सांडभोर, चंद्रकला गोसावी यांच्यासह दिनेश सांडभोर, माणिक होरे, नंदू सांडभोर, सुदाम कराळे, बापू सांडभोर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला हंडा घेऊन नगर परिषदेत आल्या होत्या. तात्काळ पाणी पूरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला संतप्त महिलांनी वेळेत पाणी सोडण्याची मागणी करीत मागणीचे निवेदन मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना दिले.
राक्षेवाडी परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना करण्यात येथील नागरिकांना या भागात वेळेत पाणी सोडण्यात येईल. -श्रीकांत लाळगे, मुख्याधिकारी





