पिंपरी | पाणी प्रश्नावर च-होलीत हंडा मोर्चा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पाणी पुरवठा खंडीत होत असल्याने च-होली, वडमुखवाडी भागातील नागरिकांनी आज प्रभागात हंडा मोर्चा काढून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा निषेध केला. धरण भरलेले असताना नागरिकांना चार ते पाच दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी (दि. २६) मोर्चा काढण्यात आला. साईनगर, माऊली नगर, लक्ष्मी नारायण नगर, मोरया नगर, तापकीर नगर, ताजने मळा, बुर्डे वस्ती या भागातील महिला, नागरिक हंडा मोर्चात सहभागी झाले होते.
माजी नगरसेवक विनया तापकीर, अनुज प्रदीप तापकीर, अनिल तापकीर, कुणाल तापकीर, दत्ताभाऊ बुर्डे, गणेश तापकीर, सागर तापकीर, अनिल सुदाम तापकीर, तुकाराम तापकीर, शुभम तापकीर, चेतन तापकीर, माऊली तापकीर, ऋषिकेश तापकीर, मीरा काळजे, माधुरी भोसले, अनिता देवकर आदीं यावेळी उपस्थित होत्या.
अजित गव्हाणे म्हणाले, चऱ्होली, वडमुखवाडी आणि डुडुळगाव भाग रेसिडेन्शिअल हब म्हणून ओळखला जातो. मात्र, या भागाला पाण्यासाठी ओरड करावी लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. येथील अनेक सोसायट्यांमध्ये चार ते पाच दिवस पाणी येत नाही. टँकरने पाणी घ्यावे लागते.
वारंवार नागरिक, सोसायटी धारक तक्रारी करत असूनही कोणी लक्ष देत नाही. पाण्याच्या तक्रारी करणाऱ्या नागरिकांना अधिकारी उध्दटपणे बोलतात. त्यामुळे नागरिक तसेच सोसायटीधारकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. या भागात महापालिकेने मोफत टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली.





