Hallmarking gold bars: सोन्याच्या बारवर हॉलमार्किंग होणार बंधनकारक

नवी दिल्ली – केंद्र सरकार सोन्याच्या बारवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहे. त्याचबरोबर ग्राहकांचे हित जपण्यासाठी प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या हिर्यांच्या नियमनासाठी एखादी चौकट तयार केली जाण्याची शक्यता असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या भारतीय दागिने या विषयावरील परिषदेत बोलताना खरे यांनी सांगितले की, ग्राहकांना योग्य दर्जाचे आणि योग्य किमतीचे सोन्याचे बार व दागिने मिळाले पाहिजेत, यावर आगामी काळात सरकारचा भर राहणार आहे. दागिने निर्मिती क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. कारण या क्षेत्रातून रोजगार निर्मिती होते. त्याचबरोबर निर्यात होऊन भारताला परकीय चलन उपलब्ध होते.
भारताने याच दृष्टिकोनातून सोन्याच्या दागिन्याच्या हॉलमार्किंगची मोहीम हाती घेतली आहे. 23 जून 2021 पासून सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत तब्बल 40 कोटी दागिन्यावर हॉलमार्किंग झाले आहे. यामुळे दागिने खरेदी करताना दागिन्याची ग्राहकांना खात्री मिळते. आता असाच प्रयोग सोन्याचे बार आणि नाण्यावर करण्याचा प्रयत्न चालू आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने खरेदी करताना संधीग्धतेचा सामना करावा लागणार नाही. त्या म्हणाल्या की दागिने उत्पादक अनेकदा सोन्याचे बार खरेदी करतात. त्याचबरोबर या बारची फेरखरेदी होते. त्यामुळे स्त्रोतांतच सोने शुद्ध असल्याची खात्री मिळण्याची आवश्यकता आहे. यासाठी सोन्याच्या बार आणि नाण्यावर हॉलमार्किंग केल्यानंतर हा प्रश्न बर्याच प्रमाणात निकाली निघू शकतो.
प्रयोग शाळेत तयार करण्यात येत असलेल्या हिर्याची मागणी भारतात वाढत आहे. तसेच ही बाजारपेठ वाढत आहे. त्यामुळे या बाजारपेठेला नियंत्रित करण्याच्या शक्यतेवरही केंद्र सरकार विचार करीत आहे. सोन्याच्या बारची शुद्धता निश्चित असल्यास सोन्याच्या दागिन्याच्या कच्च्या मालाची शुद्धता निश्चित होते. त्यामुळे सोन्याच्या दागिने बनविण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ शकतो असा यामागे उद्देश आहे.
दागिन्यांची बाजारपेठ वाढली
भारतातील सोन्याच्या दागिन्याची बाजारपेठ 2023 मध्ये 44 अब्ज डॉलरची होती. 2030 पर्यंत ही बाजारपेठ वाढून 134 अब्ज डॉलरची होणार आहे. भारतातून सोन्याच्या दागिन्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. एकूण भारतीय निर्यातीत या निर्यातीचा वाटा 3.5% आहे. या क्षेत्राचे महत्त्व ओळखून या क्षेत्राला विस्तारित करण्यासाठी भारत सरकार दागिने उत्पादकाच्या मदतीने अनेक उपाय योजना राबवित आहे. भारतात 1.95 लाख नोंदणीकृत दागिने उत्पादक आहेत. तर 1600 ठिकाणी हॉलमार्किंग केले जाते.





