“एमपीएससी”कडून संयुक्त पूर्वपरीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध

पुणे –महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) 4 सप्टेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट “ब’ संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करता येणार आहे.
करोनामुळे संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 पुढे ढकलावी लागली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावरून परीक्षा लांबणीवर पडली. त्यानंतर उमेदवारांनी आंदोलन केल्यावर 11 एप्रिलला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता 4 सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे.
परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवारांकडे प्रवेशपत्राची प्रिंटआऊट असणे आवश्यक आहे. 11 एप्रिलच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास परीक्षा केंद्रावर आणि प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी परीक्षा कक्षातील बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.





