निम्म्या डेमोक्रॅटना बायडेन ऐवजी हव्यात मिशेल ओबामा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची निम्मी प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार निवडीसाठी डझनभर प्रांतांमध्ये प्राथमिक फेरीचे मतदान देखील झाले आहे.
डेमोक्रॅट पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनच फेरउमेदवारी देण्याला मात्र विरोध होतो आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या निम्म्या सदस्यांना बायडेन यांच्याऐवजी माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, असे वाटते आहे.
अमेरिकच्या निवडणूकीचे निरीक्षण करणार्या एका गटाने हे निरीक्षण नोंदवले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणार्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाने आपला उमेदवार बदलावा, असे ४८ टक्के डेमोक्रॅटिक सदस्यांना वाटते आहे. तर उमेदवार बदलण्याच्या पर्यायाला ३८ टक्के सदस्यांनी फेटाळले आहे.
मात्र अवघ्या ३३ टक्के डेमोक्रॅटिक सदस्यांना उमेदवार बदलला जाईल, असे वाटते आहे. तर ४५ टक्के सदस्यांना बायडेन यांना वगळून अन्य कोणाला उमेदवारी दिली जाईल, असे वाटत नाही. तर १८ टक्के सदस्यांना असे काहीही होईल, असे अजिबात वाटत नाही.
जर ८१ वर्षीय बायडेन यांनी फेरनिवडीसाठी इच्छुक नसल्याचे म्हटल्यास अन्य कोणाला उमेदवारी मिळावी, या प्रश्नाला फारच थोड्या जणांनी प्रतिसाद दिला. मात्र ज्यांनी उत्तर दिले, त्यांच्या उत्तरात २० टक्के जणांनी मिशेल ओबामा यांचेच नाव सुचवले होते.
सुचवलेल्या अन्य नावांमध्ये उपाध्यक्षा कमला हॅरिस, माजी परराष्ट्र मंक्षी हिलरी क्लिंटन, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसोम आणि मिशीगनचे गव्हर्नर ग्रेचन विटमर यांच्या नावांचे पर्यायही आहेत. मात्र २७ टक्के डेमोक्रॅटनी वरीलपैकी एकही नाही, असा पर्याय निवडला आहे.





