भोसरी – भोसरीत पुणे-नाशिक हायवे जवळील नेलगे पगारीया या सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्या मधील बऱ्याच कुत्र्यांना आजार असल्यामुळे त्याचा स्थानिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. सध्याच्या लॉकडाऊनमुळे नागरिक जास्त बाहेर पडत नाहीत. परंतु अत्यंत आवश्यक वस्तू खरेदीसाठी ये-जा करताना ही मोकाट असलेली कुत्री अंगावर धावून जात आहेत.
लॉकडाऊनमुळे हॉटेल्स, चायनीज हातगाड्या वगैरे बंद असल्यामुळे कुत्र्यांची उपासमार सुरू झाली आहे. या हॉटेल्स आणि हातगाड्यांवर उरलेले अन्न फेकले जायचे, त्यावरच भटक्या कुत्र्यांचे पोट भरत होते; परंतु सध्या सर्वच बंद असल्यामुळे कुत्र्यांची उपासमार सुरू झाल्याने कुत्री आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. काही रोगट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये आजारपण बळावू शकते, तरी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, असे रहिवासी सांगत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता ही कुत्री नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. न्यूयॉर्क शहरामध्ये नुकतेच एका वाघिणीला करोनाची लागन झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे प्राण्यांनाही करोनाची लागण होते, हे स्पष्ट होत आहे. तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी. आमची सोसायटी स्वच्छ असून, या सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर, व्यापारी, आयटीयन्स राहतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत, हे चुकीचे आहे.
– तुकाराम भोपते पाटील, स्थानिक रहिवासी