हडपसर उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला

हडपसर- दुरुस्तीमुळे वाहतुकीसाठी तब्बल महिनाभर बंद असलेला हडपसर उड्डाणपूल पुण्याकडील एका बाजूने सोमवारी दुपारी अडीच वाजता सुरू करण्यात आला. त्यामुळे कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पुलाच्या बेअरिंग्ज झिजल्याने वाहनांना हदरे बसत होते. त्या दुरुस्तीसाठी ही वाहतूक बंद होती. आता नवीन बेअरिंग बसवून पुणे-सोलापूर आणि सासवडकडे जाणारा उड्डाणपूल दुरुस्त करण्यात आला आहे. सध्या हा मार्ग केवळ हलक्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. मनपा सहायक आयुक्त प्रसाद काटकर, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे आदींच्या उपस्थितीत उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.
दरम्यान, “पुढील काही दिवसांत जड वाहतुकही पुलावरून सुरू करण्यात येणार आहे. सोलापूरच्या बाजूने शहरात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या एका खांबाच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्याही बाजूने वाहतूक सुरू होईल,’ असे बोनाला यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.





