हडपसर: ‘चिंतामणी नगर’मध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

हडपसर – सय्यदनगर – हांडेवाडी रोडवरील चिंतामणी नगर येथील गल्ली क्रमांक २ मध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने लेनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून तिथल्या स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुफियान इनामदार यांनी केला आहे.
गेली अनेक महिने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर उतरून सर्वत्र पसरत आहे. या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरीयाच्या डासांची पैदास वाढलीय. गेल्या अनेक दिवसांपासून या गटाराची सफाईही करण्यात आलेली नाही. तसंच पालिकेकडे यासंदर्भात तक्रार करूनही कुणी लक्ष दिलं नसल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी केली आहे. महापालिका आधिकरी व कर्मचारी वर्ग याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी का खेळत आहे, असा संतप्त सवालही सुफियान इनामदार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, याबाबत महापालिका अधिकारी माधुरी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, चिंतामणी नगर गल्ली २ मध्ये ड्रेनेज लाईन लहान आहे. मात्र, त्यावर उपाययोजना करून जोड देऊन काम हाती घेतले होते. परंतु येथील नागरिकांनी सर्व लाईनच नवीन करा असा हट्ट धरला व काम बंद केले. येथे काम करण्यास विरोध केला आहे. तरीही आता स्वतः थांबून परिसर स्वच्छ करण्याचे काम केले जात आहे.





