Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक
Hadapsar : हडपसरच्या माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग लागून आठ पत्र्याची घरे जळून खाक झाली. एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाला; सुदैवाने जीवितहानी नाही.

Hadapsar : पुण्यातील हडपसर भागातील माळवाडी येथील विहार कॉलनीतील पत्र्याच्या घरांना गुरुवारी (ता. १०) दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत आठ घरे जळून खाक झाली. त्यातील एका घरातील घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विजय खंडू धर्माकरी, निशा करण माने, बापुराव थोरात, सुषमा बाळासाहेब गोदाम, संजय गोरे, बाबू अवसळे, अमोल पवार आणि महानंदा सूर्यवंशी यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले.
विहार कॉलनी येथे माणिक तुपे यांची पत्र्याची घरे असून, त्यांनी ती कष्टकरी कामगार कुटुंबांना भाड्याने दिली आहेत. गुरुवारी सकाळी बहुतांश कुटुंबे कामासाठी बाहेर गेली होती. निशा माने मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी एका घरातून धूर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. पाहता पाहता आगीने मोठे रूप घेतले आणि एका सिलेंडरचा स्फोट झाला.
आगीचे मोठे लोट दिसताच परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. माहिती मिळताच हडपसर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. त्यानंतर काळेपडळ आणि बी. टी. कवडे रोड येथील अग्निशामक दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. तीनही गाड्यांवरील जवानांनी काही वेळात आग आटोक्यात आणली.
घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार चेतन तुपे, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अध्यक्ष प्रशांत तुपे आणि माजी उपमहापौर निलेश मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बाधित कुटुंबांना पुढील व्यवस्था होईपर्यंत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.





