Crime News : शिरूरमध्ये सराईत दुचाकी चोरटा जेरबंद
Crime News : शहर व परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या.

शिरूर : शिरूर शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त असताना शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करीत एका सराईत दुचाकी चोरट्याला जेरबंद केले. कृष्णा उमेश आंतरकर (वय २६, रा. पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून चोरीच्या तब्बल सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
शिरूर येथील बी. जे. कॉर्नर, विद्याधाम प्रशालेच्या कंपाऊंडजवळून ५ ऑगस्ट रोजी एमएच १२ एनजी ७५३९ क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर व परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या.
त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू केला. तपासादरम्यान सदर चोरीच्या गुन्ह्यामागे कृष्णा आंतरकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तो शिरूर बाजारपेठ परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बाजारपेठ परिसरात सापळा रचला.
संशयित आंतरकर पोलिसांच्या जाळ्यात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास केला असता त्याने शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी पाच दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
आंतरकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे शिरूर परिसरातील आणखी काही दुचाकी चोरीच्या घटनांशी त्याचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार गणेश देशमाने, नितेश थोरात, अंबादास थोरे, दादाराव नागरे, विजय शिंदे, नीरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, अजय पाटील व वैभव शेलार यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.





