Fake bank accounts : बनावट बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक
पोलिसांनी आरोपींकडून अनेक महागडे मोबाईल फोन, सिम कार्ड्स, कंपन्यांची बनावट कागदपत्रे, रबर स्टॅम्प्स आणि बँकेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

Fake bank accounts : बनावट कागदपत्रांचा वापर करून बँक खाती उघडणाऱ्या आणि ऑनलाइन फसवणुकीतून मिळणारी रक्कम वळवण्यासाठी ती खाती सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून देणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात टोळीच्या मुख्य सूत्रधारासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे सलमान हबीब पठाण, साजिद निसार अहमद कोठावाला, चिराग केतन तोप्राणी, राकेश रामाशंकर मिश्रा, रक्षित के. राजेंद्र हेगडे, सय्यद वजाहत वाहीउद्दीन आणि आर्यन रितेश ठक्कर अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून अनेक महागडे मोबाईल फोन, सिम कार्ड्स, कंपन्यांची बनावट कागदपत्रे, रबर स्टॅम्प्स आणि बँकेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.
या टोळीने उघडलेल्या बँक खात्यांचा वापर देशाच्या विविध भागांत घडलेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशी संबंधित कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यासाठी केला जात होता.
माहितीनुसार, पठाणने एक नेटवर्क तयार केले होते, या नेटवर्कचे सदस्य विविध बँकांमध्ये खाती उघडत असत आणि त्या खात्यांची माहिती सायबर गुन्हेगारांना देत असत.
ऑनलाइन फसवणुकीतून मिळवलेली रक्कम आधी या खात्यांमध्ये जमा केली जात असे आणि त्यानंतर ती गुन्हेगारांकडे हस्तांतरित केली जात असे.
या बदल्यात पठाण आणि त्याच्या साथीदारांना ठराविक कमिशन मिळत असे. माहितीच्या आधारे, पोलिसांच्या सायबर विभागाने तपास सुरू केला आणि २९ जुलै रोजी बोरिवली येथील एका बँके जवळून पठाण, कोठावाला आणि तोप्राणी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून १० लाख रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन जप्त केले.
पुढील तपासात निष्पन्न झाले की, पठाण मीरा रोड येथे एक खाजगी कार्यालय चालवत होता आणि तिथूनच तो आपल्या साथीदारांच्या मदतीने बँक खाती उघडण्याचे काम समन्वित करत होता.
पोलिसांनी भाईंदर आणि मीरा रोड येथील दोन कार्यालयांवर छापे टाकले, ज्यात वाहीउद्दीन, मिश्रा, हेगडे आणि ठक्कर या आणखी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या टोळीने बनावट कागदपत्रे सादर करून दादर, माहीम, बोरीवली आणि मीरा रोड येथील एकाच बँकेच्या विविध शाखांमध्ये २७ हून अधिक खाती उघडली होती. ओळख पटलेली ही सर्व बँक खाती आता गोठवण्यात आली आहेत.





