पिंपरी – वाकड परिसरात गुरुवारी (दि. 2) छापा घालून 60 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला शुक्रवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषेश म्हणजे शहरात अवैध धंदे बंद करण्याची मागणी करणाऱ्या अपना वतन संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वडिलांनाच चोरून गुटखा विक्री करताना अटक झाल्याने शहरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अन्वर अली सुभेदार शेख (वय 58, रा. सम्राट चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अनिल सदाशिवराव गवते (वय 53) यांनी शुक्रवारी (दि. 3) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवते हे शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला आहेत. त्यांना आरोपी अन्वर शेख हा चोरून गुटखा वाहतूक आणि विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गवते यांनी छापा घालून एमएच-31-डीसी-5103 या झायलो गाडीवर छापा घालून त्यातून 60 हजार 206 रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला.
फारूख अन्वर शेख यांनी अपना वतन संघटनेच्यावतीने काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांना शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र त्याचे वडिलच गुटख्याची तस्करी करताना मिळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.