Gustavo Petro : कोलंबियाच्या अध्यक्षांवर ट्रम्प यांच्याकडून निर्बंध

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाचे अध्यक्ष गस्तावो पेट्रो यांच्यावर काल निर्बंध घातले. जागतिक पातळीवरील अमली पदार्तांच्या तस्करीमध्ये गुंतल्याचा आरोप करत पेट्रो यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या सरकारमधील सदस्यावरही ट्रम्प यांनी निर्बंध घातले आहेत. यामुळे एकेकाळी अमेरिकेशी जवळचे संबंध असलेल्या कोलंबिया आणि अमेरिकेमधील संबंध बिघडले आहेत.
पेट्रो, त्यांच्या पत्नी वेरोनिका देल अल्कोसेर गार्सिया, त्यांचे पुत्र निकोलस फर्नांडो पेट्रो बर्गोस आणि कोलंबियाचे गृहमंत्री अर्मांडो अल्बेर्टो बेनेडेट्टी यांच्यावर ट्रम्प प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. पेट्रो यांनी ड्रग कार्टेलला मोकळीक दिली असून या तस्करीला रोखण्यास नकार दिला आहे, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी एका निवेदनात म्हटले आहे. अमली पदार्थांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प कठोर पावले उचलत आहेत. आपल्या देशात ड्रग्जची तस्करी होणे, ते कधीही सहन करणार नाहीत, असेही बेसेन्ट यांनी म्हटले आहे.
आफ्रिकेतील देशांमधून अमेरिकेत ड्रग तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातून विशेषतः कोलंबियातून तस्करी करणाऱ्या बोटींवर अमेरिकेने कारवाई केली आहे. या कारवाईची व्याप्ती वाढवण्यासाठी अमेरिकेने दक्षिण अमेरिकेच्या सागरी हद्दीत विमानवाहू नौका तैनात केल्या असल्याचे पेंटॅगॉनने म्हटले आहे.
अमेरिकेचे आरोप पेट्रो यांनी धुडकावले
कोलंबियाचे अध्यक्ष पट्रो यांनी सपशेल धुडकावले आहेत. कोलंबियातून होणाऱ्या ड्रग तस्करीला रोखण्यासाठी आपण दशकभरापासून सक्रिय आहोत. कोकेनचा वापर रोखण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले आहेत. ट्रम्प यांच्या निर्बंधांप्रमाणे आपली अमेरिकेतील संपत्ती गोठवली जाणार असेल. पण अमेरिकेत आपली कोणतीही संपत्ती नाही. आपण अमेरिकेत जाण्याचाही काहीही संबंध नाही. आपल्या देशाला अमेरिकेबरोबर कोणताही व्यापार देखील करायचा नाही, असेही पेट्रो म्हणाले.





