वकील गुणरत्न सदावर्ते यांची मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका; 8 नोव्हेंबरला सुनावणी

मुंबई – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागात अनेक गावांमध्ये मराठा समाज बांधवांकडून साखळी उपोषणे करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येत आहेत.
याचदरम्यान, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ अशा घटना घडला. त्यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 25 ऑक्टोबर पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोनाविरोधात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते पुन्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात उभे राहिल्याचे दिसत आहे. याआधी मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याआधी जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सदावर्ते यांनी त्याला आव्हान दिले. पण उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले. जे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असल्याचे चित्र आहे. याच आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे.
मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून वकील सदावर्ते सातत्याने मराठा समाजावर टीका करत असल्याचे दिसून आले होते, त्यामुळे मराठा समाज नाराज होता. जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला होता. त्यानंतरही सदावर्ते यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यातच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करणारे मुख्य याचिकाकर्ते होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केल्याचे म्हटले जाते.
आता पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील 8 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत आता काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





