मुंबई : इराण – इस्त्रायल युद्ध चालू असतानाच अमेरिकेने ईराणवर हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत जागतिक चलन बाजारावर बराच परिणाम झाला आहे. शिवाय खनिज तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला खनिज तेल आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतील. यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. आज रुपयाचा भाव दिवसा अखेर 23 पैशांनी कमी होऊन 86 रुपये 78 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. खनिज तेलाच्या किमती सध्या वाढत आहेत. आगामी काळात त्या वाढल्या तर रुपयाच्या मूल्यावर आणखी दबाव येऊ शकतो असे विश्लेषकानी सांगितले. एकीकडे रुपयांसह विविध देशांच्या चलनावर नकारात्मक परिणाम होत असतानाच अमेरिकन डॉलर आता बळकट होऊन डॉलर इंडेक्स 0.60 टक्क्यांनी वाढवून 99.29 अंकावर गेला. गेल्या आठवड्यामध्ये हा निर्देशांक 98 अंकाच्या जवळपास होता. परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी कमी केली आहे. त्याचबरोबर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. मात्र रुपयास सावरण्यासाठी रिझर्व बँकेकडे पुरेशी परकीय गंगाजळी आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार भारताकडे असलेला परकीय चलन साठा 2.2 अब्ज डॉलरने वाढून 698 अब्ज डॉलर इतका झाला आहे. हे परकीय चलन भारताला जवळजवळ दीड वर्ष पुरेल एवढे आहे. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर जास्त परिणाम होणार नाही आणि झाला तर रिझर्व बँक हस्तक्षेप करून रुपया सावरु शकते असे समजले जाते.