वडोदरा, : गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात महिसागर नदीवरील 43 वर्षे जुन्या गंभीरा पुलाचा एक भाग बुधवारी सकाळी 7:30 वाजता कोसळला, यात 10 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले. हा पूल मध्य गुजरात आणि सौराष्ट्राला जोडणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही मृतांच्या वारसांना 4 लाख आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली. वडोदरा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी सांगितले की, पुलाचा 10-15 मीटर लांबीचा स्लॅब कोसळल्याने दोन ट्रक, एक ईको व्हॅन, एक पिकअप व्हॅन आणि एक ऑटोरिक्षा नदीत कोसळली. वडोदरा कलेक्टर अनिल धमेलिया यांनी सांगितले की, 9 मृतदेह बाहेर काढले असून, 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना वडोदराच्या एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांनी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) तातडीने बचाव कार्य सुरू केले. स्थानिकांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत सांगितले की, पुलाची दुरवस्था असूनही दुरुस्तीचे प्रस्ताव दुर्लक्षित राहिले. गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले की, 1985 मध्ये बांधलेल्या या पुलाची वेळोवेळी देखभाल केली जात होती, पण दुर्घटनेच्या कारणांचा तपास होईल. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तातडीने तज्ज्ञांची समिती नेमून अहवाल मागवला आहे.