पुणे | विश्रांतवाडी ड्रग प्रकरणाचे गुजरात कनेक्शन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- विश्रांतवाडी परिसरात पोलिसांनी एक कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले होते. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. आता आणखी एकाला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे.
मोहंमद अस्लम इस्माईल मर्चंट (रा. जंबुसर, जि. भरूच, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. लोहगावात विघ्नहर्ता अर्पाटमेंट येथे एका फ्लॅटमधून ड्रग विक्री सुरू होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून एक कोटी रुपये किंमतीचे ४७१ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले होते.
येथून श्रीनिवास गोदजे, रोहित बेंडे व निमेश आबनावे ( तिघे रा.पुणे), कुरियर बॉय विश्वानाथ कोनापुरे (रा. काळेपडळ, हडपसर, मूळ सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या निमेश आबनावे यांच्याकडे गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपींची चौकशी केली असता मोहंमद मर्चंटचे नाव समोर आले होते.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अविनाश लाहोटे, नीलेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली.




